क्षेपणास्त्र हल्ल्याच्या इशा-यानंतर अमेरिकेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 09:32 PM2018-01-14T21:32:06+5:302018-01-14T21:32:24+5:30
क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपत्कालीन सेवा नियंत्रण प्रशासनाकडून रस्त्यावरील फलकावर हा संदेश चुकून दिला गेला होता.
वॉशिंग्टन : क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपत्कालीन सेवा नियंत्रण प्रशासनाकडून रस्त्यावरील फलकावर हा संदेश चुकून दिला गेला होता. त्याची लगेच दुरुस्तीही केली गेली. परंतु तो मिळेपर्यंत तब्बल 40 मिनिटे गेली व तोपर्यंत हजारो नागरिक आणि पर्यटकांनी धावाधाव करत दिसेल तिकडे आश्रय घेतला.
स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.08 वाजता सर्व नागरिकांना मोबाईलवर एक आपत्कालीन अलर्ट आला. यात क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असेही निर्देश यात दिले होते. हा संदेश चुकीने गेला आणि त्यानंतर १० मिनिटात आपत्कालीन एजन्सीने ट्विट करत स्पष्ट केले की, असा कोणताही धोका नाही. यापूर्वीचा संदेश चुकीने गेल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ गेला होता आणि भीतीने नागरिकांची एकच धावपळ झाली.
अमेरिकेतील हवाई मार्गाच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जा. ही कोणतीही ड्रील नाही,' असे त्यात मेसेजमध्ये म्हटले होते. मेसेजमध्ये ही कोणतीही ड्रील नसल्याचं लिहिण्यात आल्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली.