भिन्न पितृत्वाची जुळी मुले!

By Admin | Published: March 9, 2016 06:00 AM2016-03-09T06:00:00+5:302016-03-09T06:00:00+5:30

व्हिएतनाममध्ये एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून जुळी मुले झाली असल्याची वस्तुस्थिती वैज्ञानिक चाचणीनंतर समोर आली आहे.

Separate fatherhood twins! | भिन्न पितृत्वाची जुळी मुले!

भिन्न पितृत्वाची जुळी मुले!

googlenewsNext

हनॉई (व्हिएतनाम): व्हिएतनाममध्ये एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून जुळी मुले झाली असल्याची वस्तुस्थिती वैज्ञानिक चाचणीनंतर समोर आली आहे. अशी घटना विरळी असली, तरी वैज्ञानिकदृष्ट्या ती अघटित मात्र नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
ही जुळी मुले आता दोन वर्षांची आहेत. जन्मापासूनच रंगरूपाने वेगळ््या दिसणाऱ्या या मुलांमधील भिन्नता दिवसेंदिवस वाढत गेल्यावर कुटुंबात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मुले जुळी आहेत हे खरे, पण त्यातील एक मूल कदाचित प्रसूतिगृहात जन्माच्या वेळी बदलले गेले असावे, अशी शंकाही उपस्थित झाली. यातून निर्माण झालेला ताणतणाव असह्य झाल्यावर सोक्षमोक्ष करून घेण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या जुळ््या मुलांना घेऊन राजधानी हनॉईमधील ‘सेंटर फॉर जेनेटिक अ‍ॅनेलिसिस अँड टेक्नॉलॉजिस’मध्ये घेऊन आले. तेथे माता-पिता व दोन्ही जुळ््या मुलांच्या ‘डीएनए’ चाचण्या करण्यात आल्या. त्यातून या जुळ््यांची आई एकच असली, तरी बाप मात्र वेगवेगळे असल्याचा निष्कर्ष निघाला.
व्हिएतनाम जेनेटिक असोसिएशनचे अध्यक्ष ले दिन्ह लुआँग यांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या निष्कर्षाने त्या जुळ््या मुलांच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. आता या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, यावर ते विचार करीत आहेत.
सरकारी व्हिएतनाम न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, हे अजब जुळे जन्माला आलेले कुटुंब देशाच्या उत्तरेकडील होआ बिन्ह प्रांतातील आहे. या दाम्पत्यातील ३५ वर्षांचा पती हा या दोन जुळ््यांपैकी फक्त एकाचाच जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले आहे. या जुळ्यांपैकी एका मुलाचे केस दाट व कुरळे, तर दुसऱ्याचे विरळ व सरळ आहेत.
डीएनए चाचणी करताना गोपनीयता पाळण्याची हमी देण्यात आल्याचे कारण देऊन वृत्तसंस्थेने या प्रकरणी अधिक तपशील दिलेला नाही.
गेल्या वर्षी अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात एका न्यायालयीन प्रकरणात अशा भिन्न पितृत्वाच्या जुळयांची माहिती उघड झाली होती. एका अविवाहित महिलेला जुळ््या मुली झाल्या. त्या ज्याच्यापासून झाल्या अशी त्या महिलेची धारणा होती, त्याने वाऱ्यावर सोडून दिले, म्हणून तिने त्याला उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी कोर्टात खेचले.
त्याने पितृत्व नाकारले, तेव्हा न्यायालयाने डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला. त्यातून जुळ््या मुलींपैकी फक्त एकीचाच तो जैविक पिता असल्याचे निष्पन्न झाले व न्यायालयाने फक्त त्याच मुलीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. (वृत्तसंस्था)
अशा जुळ््यांचे
प्रमाण अनिश्चित
अशी भिन्न पितृत्वाची जुळी जन्माला येण्याचे प्रमाण बहुधा ४००मध्ये एक असावे, असे वैद्यकीय अभ्यासक मानतात. अशी नेमकी किती जुळी जन्माला येतात, याची मोजदाद ठेवणे कठीण आहे. कारण प्रत्येक जुळी मुले हुबेहूब एकमेकांसारखी दिसणारी असतातच असे नाही व हुबेहूब न दिसणाऱ्या जुळ््यांचा पिता वेगळा असेल असेही नाही. फक्त डीएनए चाचणी केली, तरच भिन्न पितृत्व सिद्ध होते व प्रत्येक वेळी अशी चाचणी केली जातेच असे नाही.
> असे कसे होऊ शकते?
दर महिन्याला स्त्रीच्या बिजांडकोषातील सर्वसाधारणपणे एक स्त्रीबीज
परिपक्व होऊन फेलोपियन नलिकेच्या मार्गे गर्भाशयात येते.
गर्भाशयात हे स्त्रीबीज पाच ते सात दिवस ‘जिवंत’ राहते. या काळात शरीरसंबंधांतून पुरुषाच्या शुक्राणूचा स्त्रीबिजाशी संयोग झाल्यास
गर्भधारणा होते.
अपवाद म्हणून काही वेळा एका वेळी एकऐवजी दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात येतात. एकाच वेळी किंवा निरनिराळ््या वेळी केलेल्या
शरीरसंबंधांतून ही दोन्ही स्त्रीबिजे फलित झाली, तर दोन गर्भ तयार होतात व जुळी मुले जन्माला येतात.
दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात ‘जिवंत’ असण्याच्या काळात दोन भिन्न पुरुषांच्या शुक्राणूंनी फलित झाल्यास, तयार होणारे दोन गर्भ व जन्माला येणारी जुळी मुले भिन्न पितृत्वाची होतात.
माणसांच्या बाबतीत विरळी घडणारी ही घटना कुत्र्यांच्या बाबतीत सर्रास घडते. म्हणूनच कुत्रीला होणाऱ्या अनेक पिल्लांपैकी काही पिल्ले पांढरी, काही काळी, काही करडी तर काही अंगावर एकाहून अनेक रंगांचे ठिपके असलेली असतात.

Web Title: Separate fatherhood twins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.