भिन्न पितृत्वाची जुळी मुले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2016 08:46 PM2016-03-08T20:46:37+5:302016-03-08T20:46:37+5:30
व्हिएतनाममध्ये एका महिलेच्या पोटी जन्मलेल्या दोन जुळया मुलांचे पितृत्व भिन्न पुरुषांकडे आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ?
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
हनॉई, दि. ८ - व्हिएतनाममध्ये एका महिलेच्या पोटी जन्मलेल्या दोन जुळया मुलांचे पितृत्व भिन्न पुरुषांकडे आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ? वैज्ञानिक चाचणीतून दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून ही जुळी मुले जन्मल्याचे सिद्ध झाले आहे. अशी घटना विरळ असली तरी वैज्ञानिकदृष्टय़ा ती अघटित मात्र नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
ही जुळी मुले आता दोन वर्षांची आहेत. जन्मापासूनच रंगरूपाने वेगळ्य़ा दिसणा-या या मुलांमधील भिन्नता दिवसेदिवस वाढत गेल्यावर कुटुंबात उलटसुलट चर्चा सुरु झाली. मुले जुळी आहेत हे खरे, पण त्यातील एक मूल कदाचित प्रसूतिगृहात जन्माच्या वेळी बदलले गेले असावे, अशी शकंही उपस्थित झाली.
यातून निर्माण झालेला ताणतणाव असह्य झाल्यावर सोक्षमोक्ष करून घेण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या जुळ्य़ा मुलांना घेऊन राजधानी हनॉईमधील ‘सेंटर फॉर जेनेटिक अॅनेलिसिस अॅण्ड टेक्नॉलॉजिस’मध्ये घेऊन आले. तेथे माता-पिता व दोन्ही जुळ्य़ा मुलांच्या ‘डीएनए’ चाचण्या करण्यात आल्या. त्यातून या जुळ्य़ांची आई एकच असली तरी बाप मात्र वेगवेगळे असल्याचा निष्कर्ष निघाला.
व्हिएतनाम जेनेटिक असोसिएशनचे अध्यक्ष ले दिन्ह लुआँग यांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या निष्कर्षाने त्या जुळ्य़ा मुलांच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. आता या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा यावर ते विचार करीत आहेत.
सरकारी व्हिएतनाम न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार हे अजब जुळे जन्माला आलेले कुटुंब देशाच्या उत्तरेकडील होआ बिन्ह प्रांतातील आहे. या दाम्पत्यातील 35 वर्षाचा पती हा या दोन जुळ्य़ांपैकी फक्त एकाचाच जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले आहे. या जुळयांपैकी एका मुलाचे केस दाट व कुरळे तर दुस:याचे विरळ व सरळ आहेत.
डीएनए चाचणी करताना गोपनीयता पाळण्याची हमी देण्यात आल्याचे कारण देऊन वृत्तसंस्थेने या प्रकरणी अधिक तपशील दिलेला नाही.
गेल्या वर्षी अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात एका न्यायालयीन प्रकरणात अशा भिन्न पितृत्वाच्या जुळयांची माहिती उघड झाली होती. एका अविवाहित महिलेला जुळ्य़ा मुली झाल्या. त्या ज्याच्यापासून झाल्या अशी त्या महिलेची धारणा होती त्याने वा-यावर सोडून दिले म्हणून तिने त्याला उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी कोर्टात खेचले. त्याने पितृत्व नाकारले तेव्हा न्यायालयाने डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला. त्यातून जुळ्य़ा मुलींपैकी फक्त एकीचाच तो जैविक पिता असल्याचे निष्पन्न झाले व न्यायालयाने फक्त त्याच मुलीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती.
असे कसे होऊ शकते?
- दर महिन्याला स्त्रीच्या बिजांडकोषातील सर्वसाधारणपणो एक स्त्रीबीज परिपक्व होऊन फेलोपियन नलिकेच्या मार्गे गर्भाशयात येते.
- गर्भाशयात हे स्त्रीबीज पाच ते सात दिवस ‘जिवंत’ राहते. या काळात शरीरसंबंधांतून पुरुषाच्या शुक्राणुचा स्त्रीबिजाशी संयोग झाल्यास गर्भधारणा होते.
-अपवाद म्हणून काही वेळा एकावेळी एकऐवजी दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात येतात. एकाच वेळी किंवा निरनिराळ्य़ा वेळी केलेल्या शरीरसंबंधांतून ही दोन्ही स्त्रीबिजे फलित झाली तर दोन गर्भ तयार होतात व जुळी मुले जन्माला येतात.
-दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात ‘जिवंत’ असण्याच्या काळात दोन भिन्न पुरुषांच्या शुक्राणुंनी फलित झाल्यास तयार होणारे दोन गर्भ व जन्माला येणारी जुळी मुले भिन्न पितृत्वाची होतात.
-माणसांच्या बाबतीत विरळा घडणारी ही घटना कुत्र्यांच्या बाबतीत सर्रास घडत असते. म्हणूनच एकावेळी कुत्रीला होणा:या अनेक पिल्लांपैकी काही पिल्ले पांढरी, काही काळी, काही करडी तर काही अंगावर एकाहून अनेक रंगांचे ठिपके असलेली असतात.
अशा जुळ्य़ांचे प्रमाण अनिश्चित
अशी भिन्न पितृत्त्वाची जुळी जन्माला येण्याचे प्रमाण बहुधा ४०० मध्ये एक असावे, असे वैद्यकीय अभ्यासक मानतात. मात्र अशी नेमकी किती जुळी जन्माला येतात, याची मोजदाद ठेवणो कठीण आहे. कारण प्रत्येक जुळी मुले हुबेहुब एकमेकांसारखी दिसणारी असतातच असे नाही व हुबेहूब न दिसणा:या प्रत्येक जुळ्य़ांचा पिता वेगळा असेल असेही नाही. फक्त डीएनए चाचणी केली तरच भिन्न पितृत्व सिद्ध होते व प्रत्येक वेळी अशी चाचणी केली जातेच असे नाही.