दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडा
By admin | Published: August 5, 2016 04:18 AM2016-08-05T04:18:51+5:302016-08-05T04:18:51+5:30
दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा
इस्लामाबाद : दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला समज देताना दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करून त्यांना वेगळे पाडले पाहिजे, असे आवाहन केले.
भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काहीही हातचे न राखता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाचा केवळ निषेध पुरेसा नाही. चांगला आणि वाईट दहशतवाद असा काही नसतो, असे स्पष्ट केले. राजनाथ सिंह यांनी येथे भरलेल्या सातव्या सार्क देशांच्या अंतर्गत मंत्र्यांच्या परिषदेत दहशतवाद हा या विभागाला सतत फार मोठे आव्हान असल्याचे सांगितले.
हिंदी भाषेत केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की,‘‘केवळ दहशतवादी किंवा दहशतवाद्यांच्या संघटना यांच्याविरुद्धच कठोर कारवाई व्हायला हवी असे नाही तर दहशतवादाला ज्या व्यक्ती, संघटना आणि देश पाठिंबा देतात त्यांच्यावरही ती झाली पाहिजे.’’ कोणत्याही देशाकडून दहशतवादाचे उदात्तीकरण करणे आणि त्याला आश्रय दिला जाणार नाही याची खात्री असली पाहिजे, अशा शब्दांत सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कान टोचले.
काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनी मारला गेला त्याचे वर्णन शरीफ यांनी ‘हुतात्मा’ या शब्दांत केले होते. एका देशाचा दहशतवादी हा दुसऱ्या
देशाचा हुतात्मा किंवा स्वातंत्र्यसैनिक असू शकत नाही. मी संपूर्ण मानवजातीसाठी म्हणतो की दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका. जे दहशतवाद्यांना पाठिंबा देतात त्यांना वेगळे पाडा, असेही राजनाथ सिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)
>हस्तांदोलनही नाही
राजनाथसिंह आणि पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांची समोरासमोर भेट झाली तेव्हाही तणावाचे संबंध लपून राहिले नव्हते. राजनाथ सिंह यांनी सभागृहात जायच्या आधी खान यांच्या हाताला केवळ स्पर्श केला. ते हस्तांदोलन अजिबात नव्हते.
भारतीय माध्यमांच्या प्रतिनिधींना हा क्षण वा परिषदेचे वार्तांकन करू देण्यास पाक अधिकाऱ्यांनी बंदी घातली. बैठकीनंतर खान यांनी भोजन आयोजित केले होते परंतु ते स्वत:च तेथून निघून गेले व राजनाथ सिंह यांनीही हे भोजन टाळले.
काश्मीरमध्ये उघड दहशतवाद
काश्मीरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तो म्हणजे ‘उघड दहशतवाद’ असल्याची टीका पाकचे अंतर्गत सुरक्षामंत्री चौधरी निसार अली खान यांनी या परिषदेत केली. या रितीने पाकिस्तानने सार्क परिषदेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केलाच. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेला बळाचा वापर हा खान यांनी दहशतवाद असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यासाठी लढणे आणि दहशतवाद यात फरक असल्याचेही ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी भाषणात पाकिस्तानला जोरदारपणे फटकारल्यानंतर खान यांनी आपले लिखित भाषणातील मुद्दे बाजूस सारून त्यांना रोखठोक प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला.