इकडे युक्रेन थोपेना, नाटोशी युद्धाची तयारी; सर्बियाने सीमेवर तैनात केले रणगाडे, सैन्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:04 PM2023-09-30T17:04:31+5:302023-09-30T17:05:02+5:30
सर्बियामध्ये झालेल्या रक्तरंजित युद्धानंतर, कोसोव देश वेगळा झाला आणि २००८ मध्ये त्यांनी स्वतंत्र झाल्याचे घोषित केले.
एकीकडे युक्रेन थोपत नसताना रशिया-चीन या अभद्र युतीने आता थेट नाटोवरच हल्ला करण्याचे षडयंत्र रचले आहे. युक्रेन युद्धानंतर आता युरोपमध्ये एका मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्बियाने नाटोचे सैन्य असलेल्या कोसोवोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे, तोफा आणि सैन्याला तैनात केले आहे.
वाढलेला तणाव पाहता अमेरिकेने सर्बियाला आपले सैन्य सीमेवरून मागे घेण्याची विनंतीवजा इशारा दिला आहे. कोसोवोमध्ये नाटो देशांचे सैन्य तैनात आहे, तर सर्बियाला रशिया आणि चीनचा पाठिंबा आहे. एवढेच नाही तर यासाठी चीनने सर्बियाला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे दिली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊसने शुक्रवारी हा इशारा जारी केला आहे. उत्तर कोसोवोमधील एका मठात झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर सर्बियाने हे पाऊल उचलले आहे. या हिंसाचारात कोसोवा येथील एक पोलिस आणि सर्बियातील 3 बंदूकधारी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांतील सर्बिया आणि कोसोवोमधील हा सर्वात मोठा हिंसाचार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोसोव हा प्रदेश सर्बियापासून वेगळा होऊन देश बनला आहे, परंतू त्याला अद्याप सर्बियाने मान्यता दिलेली नसल्याने संघर्ष होत आहे.
सर्बियाच्या या पावलानंतर नाटोनेही आपल्या सैन्याची जमवाजमव कोसोवमध्ये सुरु केली आहे. हा खुपच अस्थिर करणारा घटनाक्रम आहे, सर्बियाने आपल्या सैन्याला सीमेवरून हटवावे असे अमेरिकेने म्हटले आहे. सर्बियाने गेल्या आठवड्यातच आपले सैन्य पाठविले आहे. ज्याचा उद्देश काय हे समजू शकलेले नाहीय.
1998-99 मध्ये सर्बियामध्ये झालेल्या रक्तरंजित युद्धानंतर, कोसोव देश वेगळा झाला आणि २००८ मध्ये त्यांनी स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. परंतू रशिया आणि सर्बिया या दोघांनीही ते नाकारले. कोसोवोमध्ये सर्बियन वंशाचे बरेच लोक राहतात यावरून दोघांमध्ये वाद आहे.