अमेरिका-चीनमध्ये कटकारस्थानांचा सिलसिला; वुहानची प्रयोगशाळा कायमच चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:16 AM2020-04-28T04:16:01+5:302020-04-28T06:27:07+5:30
कोरोनाचा विषाणू लॅबमध्ये तयार केल्याचा दावा तर फेसबुक आणि ट्विटरच्या पुढे जाऊन रशियातील सरकारी टेलिव्हिजन चॅनलच्या प्राइम टाइममध्ये जाऊन पोहचला होता.
न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रसार नेमका झाला कोठून यावर मतमतांतरे असले तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन यांच्यातील शाब्दिक संघर्ष जगासमोर येत आहे. आरोप प्रत्यारोप आणि कटकारस्थानांचा हा सिलसिला सुरूच आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अशा अफवा होत्या की, कोरोना हा चीनचा गोपनीय जैविक शस्त्र कार्यक्रम आहे. आधार नसलेला एक असाही दावा करण्यात येत होता की, कॅनडा आणि चीनच्या गुप्तचरांच्या एका टीमने वुहानमध्ये हा विषाणु पसरविला होता. कोरोनाचा विषाणू लॅबमध्ये तयार केल्याचा दावा तर फेसबुक आणि ट्विटरच्या पुढे जाऊन रशियातील सरकारी टेलिव्हिजन चॅनलच्या प्राइम टाइममध्ये जाऊन पोहचला होता. ही साथ पसरून तीन- चार महिने झाले तरी कारस्थानांच्या या कहाण्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.
चीनच्या विदेश मंत्रालयाच्या एका प्रवक्त्यांनी शाओ लिजियान यांनी वेळोवेळी पुराव्याविना सांगितले आहे की, कोरोनाची सुरुवात अमेरिकेतून झाली असावी. १२ मार्च रोजी त्यांनी ट्विट केले की, अमेरिकी सैन्य कोरोना विषाणू घेऊन वुहानमध्ये आले असावे. चीनच्या ग्लोबल टाइम्सनेही शाओ लिजियान यांच्या सुरात सूर मिसळला होता. शाओ लिजियान यांनी जो लेख टष्ट्वीट करत ही माहिती दिली तो लॅरी रोमानॉफ यांचा आहे. लॅरी हे ग्लोबल रिसर्चसाठी नियमित लेखन करतात. लॅरी यांनी आपल्या एका जुन्या लेखाचे निष्कर्षच पुन्हा मांडले होते की, या विषाणूंची उत्पत्ती चीनमध्ये झाली नाही. विशेष म्हणजे लॅरी यांच्या लेखात अमेरिकेवर टीका तर चीनचे समर्थन असते.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने चीनकडे बोट दाखवित आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याबाबतही ट्रम्प यापूर्वीच बोलले आहेत. अमेरिकेचे नेते आणि काही विश्लेषक मात्र कोरोनासाठी चीनला जबाबदार ठरवित आहेत. फॉक्स न्यूजच्या प्राइम टाइममध्येही याचा उल्लेख करण्यात आला की, वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार झाला.
>न्यूझीलंडने मिळविले नियंत्रण
न्यूझीलंड सरकारने दावा केला आहे की, देशात कम्युनिटी ट्रान्समिशनचा समाप्त झाले आहे. प्रभावीपणे या विषाणूला रोखले आहे. गत काही दिवसांत न्यूझीलंडमध्ये एक आकडी रुग्ण समोर येत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या दीड हजारच्या घरात आहे. तर, १८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सामाजिक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. तरीही लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान अर्डर्न यांनी सांगितले की, आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करत आहोत. देशात सुरुवातीला काही रुग्ण आढळून येताच लॉकडाऊन सुरू करण्यात आले त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.