न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 08:56 AM2019-03-17T08:56:29+5:302019-03-17T11:26:35+5:30
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
ख्राइस्टचर्च - न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात 49 जण ठार झाले असून, 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. उजव्या विचारसरणीच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाने मुस्लिमांविषयीच्या रागातून हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हैदराबादमध्ये राहणारे दोन जण गोळीबारात जखमी झाल्याची माहिती याआधी मिळाली होती. हैदराबादचे रहिवासी असलेल्या फरहाज अहसन, इम्रान अहमद खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच गुजरात आणि तेलंगणामधील तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. गोळीबार करताना माथेफिरुने फेसबुक लाइव्ह (ऑनलाइन) केल्याने हा गोळीबार लोकांना थेट पाहायला मिळाला. या प्रकारामुळे न्यूझीलंडमध्ये घबराट पसरली. पंतप्रधान जासिंडा अर्डर्न यांनी हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमधील 9 भारतीय बेपत्ता झाले असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले होते. ते गोळीबारात मरण पावले असावेत, असा अंदाज होता.
गोळीबार झाला, तेव्हा बांगलादेशचा क्रिकेट संघ मशिदीत नमाजासाठी प्रवेश करणारच होता, परंतु गोळीबाराचे वृत्त समजताच सारे खेळाडू जवळच्या ठिकाणी निघून गेले.गोळीबारानंतर न्यूझीलंड-बांगलादेश कसोटी सामना दौराच रद्द केला. या गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमध्ये कोणाला येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, माथेफिरूने खूपच जवळून गोळीबार केला. मृतात महिला व मुलांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, गोळीबार करणारा माथेफिरू हा उजव्या विचारसणीचा दहशतवादी आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लिमांचे जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे, त्याला विरोध करण्यासाठी त्याने गोळीबार केला असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे किती जण होते, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकावर गोळीबाराचा आरोप आहे. लष्कराच्या वापरातील दोन आईईडी जप्त व निष्क्रिय केले आहे.मशिदीतील पॅलिस्टिनी नागरिकाने सांगितले की, आपण एकाच्या डोक्यात गोळी लागलेली पाहिली. तीन गोळ्यांचा आवाज ऐकू आला. 10 सेकंदांनंतर पुन्हा असेच आवाज ऐकू आले. हल्लेखोरांकडे स्वयंचलित शस्त्र होते.
पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ कृपया शेअर करू नये. आम्ही फूटेज हटविण्याचा प्रयत्न करत आहोत. अल नूर मशिदीत झालेल्या हल्ल्यात 42 लोकांचा तर लिनवुड अवे मशिदीत 7 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही मशिदी पाच किमी अंतरावर आहेत. दोन्ही मशिदीत एकाच हल्लेखोराने गोळीबार केला होता का, हे स्पष्ट झाले नाही.
डोक्याला कॅमेरा लावून चित्रण
ऑनलाइन व्हिडीओ व दस्तऐवजातून स्पष्ट होते की, स्वत: माथेफिरूनेच गोळीबाराचा व्हिडीओ तयार केला. त्याने बहुधा हेल्मेट घातले होते आणि त्यावर कॅमेरा बसविला होता. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातातील रायफल व तो करीत असलेला गोळीबार स्पष्टपणे दिसत होते.