मुलीच्या आत्मघाती हल्ल्यात सात ठार
By admin | Published: February 23, 2015 10:59 PM2015-02-23T22:59:48+5:302015-02-23T22:59:48+5:30
नायजेरियाच्या ईशान्य भागात मुलीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ७ जण ठार झाले. मृतांत हल्लेखोर मुलीचाही समावेश असून तिचे वय सात वर्षांहून अधिक नसावे
कानो : नायजेरियाच्या ईशान्य भागात मुलीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ७ जण ठार झाले. मृतांत हल्लेखोर मुलीचाही समावेश असून तिचे वय सात वर्षांहून अधिक नसावे, असे म्हटले जाते. हा हल्ला योबो राज्याची आर्थिक राजधानी पोटिसकुमच्या बाजारपेठेत झाला. आत्मघाती हल्ल्यासाठी मुलांचा वापर केला जाण्याचे हे ताजे उदाहरण आहे.
प्रत्यक्षदर्शी व रुग्णालय सूत्रांनी सुरुवातीला मृतांची संख्या ६ असल्याचे म्हटले होते. मृतांमध्ये आत्मघाती मुलगी व इतर पाच जणांचा समावेश होता; मात्र पोटिसकुमच्या सरकारी रुग्णालयातील सूत्रांनी दोन जखमींचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. स्फोटात १९ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक नेते बुबा लवन यांनी दिली.
नायजेरियात २८ मार्च रोजी संसदीय निवडणूक होणार आहे. स्फोटावरून देशासमोर सुरक्षेचे गंभीर आव्हान असल्याचे दिसून येते. राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन २०११ पासून पदावर आहेत. (वृत्तसंस्था)