सात मुस्लीम देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी
By admin | Published: January 29, 2017 05:03 AM2017-01-29T05:03:26+5:302017-01-29T05:03:26+5:30
सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सिरियातील निर्वासितांनाही अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात
वॉशिंग्टन : सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सिरियातील निर्वासितांनाही अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’ असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ३0 दिवसांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही.
सिरियातील निर्वासितांनाही १२0 दिवस अमेरिकेत येता येणार नाही. याशिवाय अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया येथील नागरिकांनाही कठोर चौकशीनंतरच व्हिसा देता येईल, असेही स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागॉनला भेट दिली. त्या वेळी त्यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
ट्रम्प म्हणाले की, ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर उपाययोजना केल्या. तथापि, त्या तुटपुंज्या होत्या. कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी मी नवे नियम स्थापित करीत आहे. आमचे सैनिक विदेशात ज्यांच्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना आम्ही अमेरिकेत पाहू इच्छित नाही. अमेरिकेत आलेल्या अनेकांना अतिरेकी कारवायांच्या आरोपाखाली शिक्षा झाल्या आहेत. त्यातील बहुतांश जण पर्यटक, विद्यार्थी आणि रोजगार व्हिसा घेऊन अमेरिकेत आले होते. (वृत्तसंस्था)
निर्णयावर टीका
या आदेशामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर कमला हॅरीस यांनी म्हटले की, ही मुस्लिमांवर घातलेली बंदी आहे.
अशाच बंदीमुळे होलोकास्टच्या (हिटलरची ज्यूविरोधी हत्याकांड मोहीम) काळात अॅन फ्रँक हिला देशात प्रवेश नाकारण्यात आला होता. आम्ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ शकत नाही.
- नोबेल पारितोषिक विजेती विद्यार्थिनी मलाला युसुफझई हिने म्हटले की, या बंदी आदेशामुळे माझे हृदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय योग्य नाही.
- फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,
या आदेशामुळे मला चिंता वाटते. असंख्य अमेरिकींप्रमाणेच मीही स्थलांतरिताचा मुलगा आहे.
संरक्षण खर्चात करणार वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्करी क्षमतांत अभूतपूर्व वाढ करण्यासाठीही एक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये अमेरिका नवी लढाऊ विमाने, युद्धनौका आणि अन्य युद्ध साहित्याची उभारणी करणार आहे. नवे संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांच्या शपथविधी समारंभानंतर ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. मॅटीस हे अमेरिकी नौदलाचे माजी जनरल आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की, लष्करी साहित्यावरील वाढीव खर्च पाहून काँग्रेस सभागृहाला आनंदच होईल.