शास्त्रज्ञांनी शोधल्या बेडकाच्या सात नव्या प्रजाती
By Admin | Published: February 23, 2017 01:22 AM2017-02-23T01:22:03+5:302017-02-23T01:22:03+5:30
भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत
नवी दिल्ली : भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत की, लहान मुलाच्या अंगठ्याच्या नखावरही मावू शकतात. गुप्त अधिवास आणि किड्यांसारखा आवाज यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले होते, असे दिल्ली विद्यापीठातील दोन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर एस. डी. बिजू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हे बेडूक छोट्या भौगोलिक प्रदेशातील असल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. वाघ आणि हत्ती यासारख्या मोठ्या प्राण्यांसह या छोट्या उभयचर जीवांचे संरक्षणही गरजेचे आहे. पश्चिम घाटातील बेडकांपैकी एकतृतीयांश प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या सात प्रजातींपैकी पाच प्रजातींही धोक्यात असून त्यांचे तातडीने जतन करण्याची गरज आहे. या प्रजाती बेडकांच्या इतर प्रजातींहून भिन्न आहेत. इतर बेडूक केवळ रात्री सक्रिय असतात; परंतु या प्रजातींचे बेडूक दिवसा तद्वतच रात्रीही सक्रिय असतात. नव्या सात प्रजातींपैकी चार प्रजाती १२.२ ते १५.४ मिलिमीटर एवढ्या लांबीच्या आहेत, असे ते म्हणाले.
या जंगलात मोठ्या संख्येने हे बेडूक आढळून येतात. आकाराने खूपच लहान असल्यामुळेच कदाचित कोणाचे आतापर्यंत त्यांच्याकडे लक्ष गेले नसावे. हे बेडूक मोठ्या संख्येने आहेत. तथापि, त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. हे बेडूक वेगवेगळ्या नाही तर एकाच भागात दिसून आले. अनेक बेडूक तर त्यांच्या अधिवासापासून दूर शेतात आणि बागांमध्ये आढळून आले. मानवी वावर असल्यामुळे या जागा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरू शकतात. दिल्ली विद्यापीठाच्या सोनाली गर्ग यांनी सांगितले की, हे बेडूक जमिनीवर राहतात आणि रात्री रातकिडे, तसेच पतंगांसारखा आवाज काढतात. नव्या जीवांचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकात सोनाली यांचा समावेश आहे. निशाचर बेडकांचा गट निक्टिबाट्रेचस या नावाने ओळखला जातो. या गटात आधीच २८ मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. त्यातील केवळ तीन प्रजातींचा आकार १८ मि.मी.हून कमी आहे. आता या गटातील ज्ञात प्रजातींची संख्या वाढून ३५ झाली आहे. पश्चिम घाटात आढळणारी ही प्रजाती ७-८ कोटी वर्षे जुनी आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समांतर असलेल्या पर्वतराजीत शेकडोंच्या संख्येने दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पती आणि जीवजंतू आहेत; परंतु त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे.
संशोधक दीर्घ काळापासून पश्चिम घाटाजवळील जंगलात संशोधन करीत होते. मागील पाच वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना या जंगलात बेडकाच्या नव्या प्रजातींचा शोध लागला. जैव विविधतेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अत्यंत संपन्न समजला जातो. जैव विविधतेबाबत बोलायचे झाल्यास पश्चिम घाटातील या जंगलाची तुलना अमेझॉनशी केली जाते. २००६ पासून आतापर्यंत येथे उभयचर प्राण्यांच्या १०० हून अधिक नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत.