सात प्रवाशांचा उभ्याने विमान प्रवास; सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: February 27, 2017 04:36 AM2017-02-27T04:36:55+5:302017-02-27T04:36:55+5:30
सात प्रवाशांनी कराची ते मदिना हा तीन तासांचा प्रवास उभे राहून केल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर, कंपनीने या प्रकाराची चौकशी सुरू केली
इस्लामाबाद : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) या पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या विमानातून गेल्या महिन्यांत सात प्रवाशांनी कराची ते मदिना हा तीन तासांचा प्रवास उभे राहून केल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर, कंपनीने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या २० जानेवारी रोजी ‘पीआयए’चे बोइंग ७७७ विमान कराचीहून मदिनासाठी रवाना झाले, तेव्हा त्यात क्षमतेपेक्षा सात जादा प्रवासी कोंबण्यात आले होते. अर्थात, या प्रवाशांना बसण्यासाठी आसने उपलब्ध नसल्याने त्यांनी आसनांच्या रांगांमध्ये असलेल्या मोकळ््या जागेत उभे राहून हा प्रवास केला.
या विमानाची आसनक्षमता, विमान कर्मचाऱ्यांसाठी असलेली आसने धरून ४०९ आहे. सर्व तिकिटे विकली गेलेली होती व सर्व प्रवासी आपापल्या आसनावर बसलेले होते. ‘डॉन’च्या वृत्तानुसार विमान सुटण्याच्या थोडा वेळ आधी विमानतळावर काम करणाऱ्या कंपनीच्या ट्रॅफिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सात जादा प्रवाशांना हाती लिहिलेले बोर्डिंग पास बनवून दिले व विमानात पाठविले.
विमानाचे वैमानिक अन्वर अदिल म्हणाले की, ‘विमानतळाच्या चेक-इन काउंटरवर काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या जादा प्रवाशांना, केबिन क्रुसाठी असलेल्या ‘जम्प सीट’वर बसून प्रवास करू द्यावा, अशी मला विनंती केली होती, परंतु मी त्यास साफ नकार दिला होता.’
कॅप्टन अदिल म्हणाले की, ‘विमानाचे उड्डाण झाल्यावर मी कॉकपीटमधून बाहेर आलो, तेव्हा मला मार्गिकांमध्ये उभे असलेले हे प्रवासी दिसले. मी फ्लाइट पर्सरकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी हे जादा प्रवासी विमानात कोंबल्याचे सांगितले.’ कॅप्टन अदिल म्हणाले की, ‘ही गोष्ट लक्षात आली, तोपर्यंत विमान उंच आकाशात उडालेले होते व त्याने निर्धारित मार्ग धरलेला होता. विमान परत मागे वळवून कराचीला उतरवायचे म्हटले असते, तर वेळेसोबत बरेच इंधनही वाया गेले असते. म्हणून या जास्त प्रवाशांना खाली न उतरविता विमान तसेच पुढे मदिनापर्यंत नेण्यात आले.’ एके काळी उत्तम सेवेसाठी ख्याती असलेली ‘पीआयए’ आता आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे, तसेच तिचे व्यवस्थापनही पार खिळखिळे झाले आहे.
‘डॉन’च्या या वृत्तानंतर कंपनीने हा प्रकार घडल्याची कबुली दिली असून, याची चौकशी करून जबाबदार ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
>सुरक्षेला मोठा धोका
विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे आणि त्यांनी उभ्याने प्रवास करणे हा हवाई सुरक्षेच्या दृष्टीने फार मोठा धोका मानला जातो. काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला, तर अशा उभ्या असलेल्या प्रवाशांना आॅक्सिजन मास्क पुरविला जाऊ शकत नाही.
शिवाय त्यांच्या उभे राहण्याने मार्गिकेत अडथळा येत असल्याने प्रवाशांना बाहेर काढायची वेळ आली, तर त्यातही मोठी अडचण होऊ शकते.