अमेरिकेचे सात खलाशी बेपत्ता
By admin | Published: June 17, 2017 07:44 PM2017-06-17T19:44:45+5:302017-06-17T19:44:45+5:30
अमेरिकन विनाशिका आणि फिलिपाइन्सच्या जहाजाच्या अपघातानंतर सात खलाशी बेपत्ता झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि.17- अमेरिकेची विनाशिका यूएसएस फिट्झगेराल्ड आणि फिलिपाइन्सचे एसीएक्स क्रीस्टल ही जहाजे जपानजवळच्या समुद्रात आदळून झालेल्या अपघातानंतर अमेरिकेचे सात खलाशी बेपत्ता असल्याची माहिती उघड झाली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. जपानच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर अमेरिकन विनाशिकेमध्ये थोडे पाणी घुसले मात्र तिला बुडण्याचा कोणताही धोका नव्हता. त्याचप्रमाणे फिलिपाइन्सच्या जहाजालाही पुढील प्रवासासाठी कोणताही अडथळा नव्हता. योकोसुका येथील तळावर असणाऱ्या आठ जहाजांच्या ताफ्यात असणाऱ्या फिट्झगेराल्डची फेब्रुवारी 2017 मध्येच 21 दशलक्ष डॉलर्स खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली होती.
अमेरिकन विनाशिकेवरील कमांडिंग ऑफिसर ब्रायसी बेन्सन यांच्यासह तिघांना योकोसुका येथील अमेरिकन नौदलाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फिलिपाइन्सच्या जहाजावरील कोणीही जखमी झाले नसल्याचेही जपानच्या तटरक्षक दलाने स्पष्ट केले. ही टक्कर कशी झाली हे अद्याप समजले नसून तपासानंतरच त्यामागचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती अमेरिकन नौदलाच्या सातव्या ताफ्याच्या प्रवक्त्याने दिली आहे. सध्या आम्ही केवळ जहाजाचे संरक्षण आणि जखमी खलाशांची काळजी या दोनच गोष्टींवर भर देत आहोत असे यू.एस.पॅसिफिक ताफ्याचे कमांडर अॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर बेपत्ता असणाऱ्या सात खलाशांचा शोध अमेरिकन नौदल आणि जपानी तटरक्षक दल घेत आहेत. जपानमधील टोकियो आणि योकोहामा बंदरांवर विविध व्यापारी जहाजांची नेहमीच मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. त्यामुळे या बंदरांवर सर्वात जास्त गर्दी असते आणि येथील जलमार्गांवर देश-विदेशांतील जहाजे सतत ये-जा करत असतात. याच वर्षी मे महिन्यामध्ये अमेरिकन जहाज लेक चॅम्पलिनची मासेमारी करणाऱ्या दक्षिण कोरियन जहाजाशी धडक होऊन अपघात झाला होता.