तालिबानच्या गाेळीबारात मुलांसह 17 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 05:43 IST2021-09-05T05:42:35+5:302021-09-05T05:43:08+5:30
पंजशीर ताब्यात घेतल्याचा असुरी जल्लाेष, विराेधी गटाने दावा फेटाळला

तालिबानच्या गाेळीबारात मुलांसह 17 जणांचा मृत्यू
काबुल : पंजशीर खाेरे ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर तालिबान्यांनी काबुलमध्ये जल्लाेषात गाेळीबार केला. मात्र, त्यात लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जण जखमी झाले. तर पंजशीर खाेऱ्यातील विराेधी गटाने तालिबानचा दावा फेटाळला. तालिबानने पंजशीर खाेऱ्याचा ताबा मिळविल्याचा दावा केला हाेता. संपूर्ण अफगाणिस्तानवर आता तालिबानचे नियंत्रण असून, पंजशीर खाेऱ्यातील विराेधकांना पराभूत करण्यात आले आहे, असे तालिबानी कमांडर्सनी सांगितले.
नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानचा पराभव केल्याच्या दाव्यानंतर काबुलमध्ये तालिबान्यांनी माेठा जल्लाेष केला. त्या वेळी केलेल्या जाेरदार गाेळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश असून, ४१ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या प्रकारानंतर एकच गाेंधळ उडाला. घटनेचे अनेक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात अनेक जण जखमी नातेवाइकांना घेऊन रुग्णालयात नेताना दिसतात. गाेळीबारानंतर परिसरातील नागरिकांना माेठा धक्का बसला.
तालिबानचा काबुलमध्ये जल्लाेष सुरू असताना पंजशीर खाेऱ्यातील विराेधी गटाने तालिबानचा दावा फेटाळला. उलट तालिबानच्या अनेक जणांना ठार केल्याचे विराेधी गटाचे प्रमुख अहमद मसूदने म्हटले आहे. पाकिस्तानी माध्यमे हे खाेटे वृत्त पसरवित असल्याचे मसूदने स्पष्ट केले. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी तालिबान आणि पंजशीरमधील विराेधी गटाला चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.
सरकार स्थापनेची घाेषणा पुन्हा लांबणीवर
n काबूल : तालिबानने सरकार स्थापनेची घाेषणा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकली आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादार याच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणार असल्याची घाेषणा शुक्रवारी करण्यात येणार हाेती.
n आंतरराष्ट्रीय समुदायाकडून स्वीकारण्यात येईल, अशा सरकारची स्थापना करण्याचे तालिबानचे प्रयत्न आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद हे काबूलमध्ये दाखल झाले आहेत.
तालिबानविराेधात महिला पुन्हा रस्त्यावर
n अफगाणिस्तानातील सरकारमध्ये महिलांना याेग्य स्थान मिळावे तसेच शिक्षण आणि राेजगार हक्काच्या मागणीसाठी अफगाणिस्तानातील महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या. हेरातनंतर आता काबुलमधील महिलांनी राष्ट्रपती भवनावर माेर्चा काढला.
n यामध्ये महिला पत्रकारांसह अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश हाेता. मात्र, तालिबान्यांनी त्यांना अडविले. या वेळी काही महिलांसाेबत त्यांची शाब्दिक चकमकही उडाली.
n महिलांनी तालिबान्यांच्या हातातील माइक ओढल्याचेही एका व्हिडिओमध्ये दिसले. यावरून महिला आक्रमक झाल्याचे स्पष्ट हाेत आहे.