सत्तर वर्षांच्या आईचं चाळिसावं पिल्लू...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:33 AM2021-03-06T05:33:51+5:302021-03-06T05:34:00+5:30

एरवी तिचा मुक्काम असतो प्रशांत महासागरावर कुठेतरी. सध्या मात्र बाई प्रशांत महासागराच्या दक्षिणेला असलेल्या एका लहानशा प्रवाळ बेटावर विश्रांतीला थांबलेल्या आहेत. फारशा कुठे दूर उडत जात नाहीत, कारण त्यांना सध्या तेवढी उसंतच नाही.

Seventy year old mother's forty puppies ... | सत्तर वर्षांच्या आईचं चाळिसावं पिल्लू...

सत्तर वर्षांच्या आईचं चाळिसावं पिल्लू...

googlenewsNext


तर, तिचं वय आहे अदमासे सत्तर वर्षं. एरवी तिचा मुक्काम असतो प्रशांत महासागरावर कुठेतरी. सध्या मात्र बाई प्रशांत महासागराच्या दक्षिणेला असलेल्या एका लहानशा प्रवाळ बेटावर विश्रांतीला थांबलेल्या आहेत. फारशा कुठे दूर उडत जात नाहीत, कारण त्यांना सध्या तेवढी उसंतच नाही. त्यांनी जन्माला घातलेलं  नवं पिल्लू नुकतंच म्हणजे गेल्या १ फेब्रुवारीला अंड्यातून बाहेर आलं आहे आणि त्या पिल्लाच्या पालनपोषणातच हल्ली त्यांचा बराचसा वेळ जातो. हे नवं पिल्लू म्हणजे या बाईंचं  चाळिसावं अपत्य आहे असं गणित समोर आल्यामुळे त्या सध्या जागतिक  ‘बातमी’चा विषय होऊन एकदम व्हायरल झाल्या आहेत.


कोण या बाई? - तर ही आहे समुद्रपक्ष्याची मादी. तिला एक नावही आहे. विजडम. ही विजडम आहे सत्तर वर्षांची. संशोधकांच्या जगात परिचयाचा असलेला हा सर्वाधिक वयाचा पक्षी आहे; म्हणून तर या विजडमवर जगभरातल्या पक्षी - अभ्यासकांचं बारीक लक्ष असतं; आणि नजरही! - कारण विजडमच्या पायात कॉलर लावलेली आहे. त्या कॉलरच्या माध्यमातून विजडमचा फक्त ठावठिकाणाच नव्हे, तर तिचे नवनवे प्रियकर, त्यांच्याबरोबरचं प्रियाराधन आणि तिने जन्माला घातलेल्या पिल्लांसह सगळीच माहिती अभ्यासकांना दर क्षणी मिळत असते. विजडमची कहाणी सुरू झाली १९५६ साली. आत्ता ती जिथे आहे, त्याच प्रशांत महासागरातल्या प्रवाळ बेटावर यूएस फीश अँड वाईल्डलाईफ या संस्थेच्या अभ्यासकांनी तिच्या पायात कॉलर घातली आणि तिला नाव दिलं विजडम. ती तेव्हा पाच वर्षांची असावी, असा अंदाज तेव्हा व्यक्त केला गेला आणि विजडमची नोंद झाली. तेव्हापासून संशोधक तिच्या जीवनक्रमावर लक्ष ठेवून होते. पण, मध्येच विजडम गायब झाली आणि तिचा ठावठिकाणाही मिळेनासा झाला.
२००२ सालच्या उन्हाळ्यात  यूएस फीश अँड वाईल्डलाईफचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ शनैडलर रॉबिन्सन प्रशांत महासागरातल्या त्याच प्रवाळ बेटावर भटकंती करीत असताना त्यांना पायात कॉलर लावलेला एक समुद्रपक्षी दिसला. त्यांनी त्या पक्ष्याला पकडून कॉलरची तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि हा पक्षी म्हणजेच गेली अनेक वर्षं गायब असलेली विजडम! ती परत भेटल्याने रॉबिन्सन यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गंमत म्हणजे १९५६ साली विजडमच्या पायात कॉलर लावली होती ती रॉबिन्सन यांनीच! ती पुन्हा त्याच जागी त्याच व्यक्तीला भेटावी, या विलक्षण योगायोगाची चर्चा तेव्हा चांगलीच रंगली होती.


पण, १९५६ साली दिसलेली विजडम अजून जिवंत आहे, याचं तेव्हा संशोधकांना फारच आश्चर्य वाटलं होतं, कारण समुद्रपक्षी दीर्घायुषी नसतात, असा तोवरचा समज होता. पण, विजडमने मात्र पक्ष्यांच्या आयुर्मानाबाबतचे तोवरचे समज, अभ्यास हे सारंच खोटं ठरवलं.
२००२ पासून विजडम पुन्हा एकवार पक्षी-अभ्यासकांच्या रडारवर आली आणि तिच्या प्रत्येक हालचालीची नोंदही होऊ लागली. समुद्रपक्षी त्यांच्या लैंगिक आयुष्यात एकाच जोडीदाराशी बांधलेले असतात. समुद्रपक्ष्यांची ही एकनिष्ठा अनेक लेखक-कवींच्या लेखनाचा विषयही झालेली आहे. - पण विजडमने त्याही समजाला काहीसा धक्काच दिला. 
२०१० पासून तिच्याबरोबर असलेला नर जोडीदार २०१८ नंतर मात्र दिसलेला नाही. त्याला दिलेलं नावही मोठं गमतीदार आहे : अकीयाकामाई! तर या अकीयाकामाईच्या बरोबरीने विजडम सतत असे आणि तोच तिच्या पिल्लांचा बापही होता. २०१८ नंतर मात्र अकीयाकामाई गायब झाला आणि विजडम दरवर्षी नव्या जोडीदाराबरोबर दिसू लागली. समुद्रपक्षी  दीर्घायुषी नसतात. विजडम त्याही नियमाला अपवाद असावी आणि म्हणूनच तिला नव्या जोडीदाराबरोबर संसार थाटावा लागलेला असावा, असाही एक तर्क व्यक्त केला जातो.
विजडम पाच वर्षांची असताना पक्षी निरीक्षकांच्या जगात उडून आली. समुद्रपक्षी पाचव्या वर्षी प्रजननक्षम होतात. तेव्हापासूनचा तिचा जीवनक्रम आणि २००२ सालापासूनच्या तिच्या अंडी देण्याची वारंवारता यांचा अभ्यास करता गेल्या महिन्यात जन्माला आलेलं पिल्लू हे विजडमचं चाळिसावं बाळ असणार असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 - तर सध्या ही विजडम प्रशांत महासागरातल्या एका प्रवाळ बेटावर आपल्या नव्या बाळासह मजेत राहाते आहे. अमेरिकेतील हवाई बेटांच्या उत्तर-पश्चिम टोकापासून खोल महासागरात तब्बल १३०० मैलांवर हे बेट आहे.
पक्षी-अभ्यासकांच्या दृष्टीने विजडम महत्त्वाची आहे; कारण आजघडीला मानवाला ज्ञात असलेला तो सर्वा़त जास्त वयाचा पक्षी आहे.

बाळ-बाळंतीण सुखरूप
मरीन नॅशनल मॉन्यूमेंटस ऑफ द पॅसिफिक या संस्थेचे ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ बेथ फ्लिंट म्हणतात, “विजडमने  आमचे अनेक जुने अभ्यास खोटे ठरवले आहेत आणि अनेक अंदाज नव्याने बांधायला भाग पाडलं आहे. तिच्या सगळ्या पिल्लांची नोंद आमच्याकडे नाही, पण गेल्या काही वर्षांतल्या तिच्या प्रजननाचा अभ्यास करता एक नक्की : हे तिचं किमान चाळिसावं तरी बाळ आहे!” 
- आणि महत्त्वाचं म्हणजे बाळ-बाळंतीण मजेत आहेत!

Web Title: Seventy year old mother's forty puppies ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.