श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:13 AM2019-04-22T05:13:24+5:302019-04-22T05:13:43+5:30
चर्च, हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट; पोप फ्रान्सिस म्हणाले, हा तर अत्यंत क्रूर हिंसाचार
कोलंबो : श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
चर्च व हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून निरपराध व्यक्तींचा बळी घेणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करावा तेवढा थोडाच आहे अशी
प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे.
या बॉम्बस्फोटांचा आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आड्रेन तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच बहारिन, कतार, संयुक्त अरब अमिरातीनेही तीव्र निषेध केला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एंजल मर्केल यांनी म्हटले आहे की, दहशतवाद समुळ नायनाट करायला हवा. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनी ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी हल्ल्याचा निषेध केला.
इस्टर संडेच्या दिवशी कोलंबोमध्ये घडविण्यात आलेल्या भीषण रक्तपाताचा पोप फ्रान्सिस यांनी तीव्र निषेध केला आहे. श्रीलंकेमध्ये प्रार्थनेत मग्न असलेल्या ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करून संपविण्यात आले. हा अत्यंत क्रूर हिंसाचार आहे. या घटनेत मरण पावलेल्यांना त्यांनी श्रद्घांजली वाहिली. यापूर्वी २००८च्या बस धमाक्यांमध्ये श्रीलंकेत २२ जण ठार झाले होते व १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आजच्या घटनेने श्रीलंकेतील हल्ल्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)
पर्यटनावरील परिणाम अल्प काळ टिकेल -ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मत
नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे त्या देशातील पर्यटन व्यवसायाला फटका बसणार असला तरी तो परिणाम फार काळ टिकणार नाही, असे मत आघाडीच्या पर्यटनसंस्थांनी व्यक्त केले आहे.
श्रीलंकेमध्ये जगभरातून २०१८ साली २३ लाख पर्यटक आले. त्यामध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती. भारतातून येणाºया पर्यटकांमुळे श्रीलंकेला मोठा महसूल मिळतो. पण आता बॉम्बस्फोटांमुळे पर्यटकांनी श्रीलंकेला जाण्याचा बेत रहित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हॉटेलची, प्रवासी गाड्यांची केलेली बुकिंग रद्द करण्यासाठी पर्यटकांनी पर्यटनसंस्थांकडे आग्रह धरला आहे.
यात्रा डॉट कॉमचे एक अधिकारी शरत धल्ल यांनी सांगितले की, श्रीलंकेमध्ये जाऊ इच्छिणाºया पर्यटकांचा ओघ बॉम्बस्फोटांमुळे येत्या काही दिवसांत कमी होणार आहे. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. वीणा ट्रॅव्हल्सच्या संचालिका वीणा पाटील यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंकेच्या पर्यटनाला फटका बसणार असला तरी तो अल्पकाळापुरता असेल. जे पर्यटक विमानतिकिट रद्द करू इच्छितात त्यांनी तिकिटासाठी दिलेली रक्कम एकही पैसा न कापता परत देण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. ही सवलत २४ एप्रिलपर्यंत श्रीलंकेसाठी काढलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या तिकीटांसाठीच आहे. कॉक्स अँड किंग्ज पर्यटन संस्थेच्या करण आनंद यांनी सांगितले की, श्रीलंकेत मौजमजा करण्यासाठी गेलेले बहुसंख्य पर्यटक कँडी, बेन्टोना या भागात राहातात.
भारतातील सहली झाल्या महाग
श्रीलंकेत आपल्या संस्थेकडून गेलेले पर्यटक सुरक्षित असल्याची खात्री भारतातील पर्यटनसंस्थांनी केली आहे. थॉमस कुक इंडिया ग्रुपचे अध्यक्ष माधवन मेनन यांनी सांगितले की, आमच्या संस्थेकडून श्रीलंकेला गेलेले सर्व पर्यटक सुखरूप आहेत. केरळमध्ये गेल्या आॅगस्टमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे जाणे टाळून अनेक पर्यटकांचे पाय श्रीलंकेच्या दिशेने वळले आहेत.
भारतामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांचा इन्सेन्टिव्ह व कॉन्फरन्स टूर्स आयोजित करण्याचा खर्च वाढला. श्रीलंकेत अशा टूर्स आयोजित करणे तुलनेने स्वस्त पडत आहे. त्यामुळे या देशात जाणाºया भारतीय पर्यटकांची संख्या वाढली आहे.
मदतीसाठी भारत तयार
नवी दिल्ली : साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने आश्वस्त केले आहे. आरोग्य मंत्रालयाने मदतकार्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व रेड क्रॉस सोसायटीची पथके पाठवण्याची तयारी केली आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांनी लोकमतला विशेष माहिती देताना सांगितले की, श्रीलंकेला मदत करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व विदेश मंत्रालयाने श्रीलंकेला मदत करण्यासाठी आश्वस्त केले. शेजारी देशाने मदत मागितल्यानंतर सरकारच्या निर्देशानुसार मदतकार्यासाठी पथके त्या देशात पाठवली जातील.
केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले की, रेड क्रॉस सोसायटीबरोबरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकालाही तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. गरजेनुसार त्यांना श्रीलंकेत पाठवण्यात येईल.
आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाºयाने सांगतले की, २०१६मध्ये चक्रीवादळाने श्रीलंकेत हाहाकार माजवला असताना भारताने या शेजारी देशात औषधी, तंबू, खाद्यपदार्थांसह नौदलाचे दोन जहाज व एक सी-१७ विमान पाठवले होते.
हिंसक कारवाया म्हणजे मानवतेसमोर मोठे आव्हान -मोदी
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना व पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, थंड डोक्याने व पूर्वनियोजित पद्धतीने श्रीलंकेत रविवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत. या हिंसक कारवाया म्हणजे मानवतेसमोर मोठे आव्हान आहे.