नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 06:59 PM2017-07-28T18:59:38+5:302017-07-28T19:03:25+5:30
पनामागेट प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नवाज शरीफ यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे छोटे बंधू शाहबाज शरीफ
इस्लामाबाद, दि. 28 - पनामागेट प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नवाज शरीफ यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे छोटे बंधू शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानच्या मीडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजची (पीएमएल-एन) आज एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शाहबाज यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाहबाज हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचे सदस्य नसल्याने ते तात्काळ पंतप्रधान बनू शकत नाही असं वृत्त आहे. त्यामुळे 45 दिवसांसाठी दुस-या व्यक्तीला हंगामी पंतप्रधान बनवलं जाईल. तोपर्यंत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे हंगामी पंतप्रधान बनू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दोषी ठरवलं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 11:30 वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायालायने निकाल दिला.
पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.
काय आहे पनामागेट प्रकरण?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत.
मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती.
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.