शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान?, पाकमध्ये आज होणार निर्णय; बिलावल भुत्तो यांना परराष्ट्र खाते मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:16 AM2022-04-11T06:16:45+5:302022-04-11T06:17:05+5:30
अविश्वास प्रस्तावादरम्यान सभागृह सोडून गेलेले इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी ११ एप्रिलला होईल.
इस्लामाबाद :
अविश्वास प्रस्तावादरम्यान सभागृह सोडून गेलेले इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड सोमवारी ११ एप्रिलला होईल. त्यासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे शाहबाज शरीफ आणि खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे शाह महमूद कुरेशी यांनी अर्ज दाखल केले. सध्याची स्थिती पाहता शाहबाज यांचे पारडे जड दिसते आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने शरीफ यांच्या पक्षाशी आघाडी केली आहे. पक्षाचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी विराेधकांच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी शरीफ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. बिलावल भुत्तो परराष्ट्रमंत्री होऊ शकतात. चौकशी करणारे अधिकारी रजेवर
शरीफ यांच्याविराेधात आर्थिक गैरव्यवहाराचे आराेप असून त्याची चाैकशी फेडरल तपास संस्था करीत आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरीफ यांचे नाव आघाडीवर येताच तपास करणारे माेहम्मद रिझवान तातडीने रजेवर गेले आहेत.
अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडणारे इम्रान खान हे पहिलेच
- ३४२ सदस्यसंख्या असलेल्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती.
- मतदानावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली.
- अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना अपयश आले.
- १८ ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदी आले. त्यांचे सरकार ३ वर्षे ७ महिने २३ चालले. अविश्वास प्रस्तावावर १२ तासहून अधिक वेळ चर्चा झाली.
नव्या सरकारकडे केवळ ५ महिने
पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात ३४२ एवढे संख्याबळ आहे. नव्या पंतप्रधानाला १७२ मते मिळविणे आवश्यक आहे. नव्या सरकारच्या हाती केवळ ५ महिनेच राहणार असून ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे.
खान यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे
अविश्वास प्रस्ताव गमाविल्यानंतर इम्रान खान यांचे अतिशय जवळचे सहकारी डाॅ. अर्सलान खालीद यांच्या घरावर छापे मारण्यात आले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे फाेन ताब्यात घेण्यात आले. इम्रान खान यांच्या प्रचार माेहिमेत खालीद यांची भूमिका खूप महत्त्वाची हाेती.