शाहबाज यांच्या मानहानीचे प्रकरण; इम्रान खान यांना कोर्टाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:42 AM2020-06-07T05:42:44+5:302020-06-07T05:43:15+5:30
पाकिस्तान । नवाज शरीफ यांना वाचवण्यासाठी लाच देऊ केल्याचा दावा भोवला
लाहोर : पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोटीस जारी केली आहे. शरीफ यांनी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या प्रमुखांवर दाखल केलेल्या या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मागील तीन वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे.
शाहबाज शरीफ यांनी देशाचे ७० वर्षीय माजी पंतप्रधान व त्यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला पनामा पेपर खटला मागे घेण्यासाठी एका मित्रामार्फत ६.१ कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा केला होता, असे वक्तव्य इम्रान खान यांनी एप्रिल २०१७ मध्ये केले होते. तथापि, इम्रान खान यांनी पैसे देऊ करणाऱ्या शाहबाज यांच्या मित्राचे नाव घेतले नव्हते.
लाहोरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० जून रोजी सुनावणी करण्यासंबंधीच्या शाहबाज यांच्या अर्जावर शुक्रवारी लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, इम्रान खान हे मागील तीन वर्षांपासून लेखी उत्तर दाखल करण्यात अयशस्वी झाले आहेत. या खटल्यात काहीही खास अशी प्रगती झालेली नाही. शाहबाज यांच्या वकिलाने म्हटले होते की, या खटल्यातील ६० सुनावणीपैकी ३३ सुनावणीत खान यांच्या वकिलांनी ३३ वेळा स्थगन देण्याची मागणी केली होती. मागील सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते की, खान यांचे मुख्य कायदेशीर सल्लागार बाबर अवान हे कोरोनामुळे इस्लामाबादहून लाहोरला येऊ शकत नाहीत. त्यावेळी सुनावणी २२ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आपल्या मानहानीच्या बदल्यात शाहबाज यांनी ६.१ कोटी डॉलरच्या भरपाईची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहैल अंजुम यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना १० जूनपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
‘इम्रान यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अधिकार उरणार नाही’
च्पीएमएल-एनच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान या खटल्यात पुरावा सादर करू शकणार नाहीत. त्यांना ६.१ कोटी डॉलर देण्याची आॅफर कोणी दिली होती, त्यांनी तो पुरावा दाखल करावाच, असे त्यांना माझे आव्हान आहे.
च्ते १० जून रोजी पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरले तर ते खोटारडे आहेत, हे सिद्ध होईल. त्यामुळे त्यांना नॅशनल असेम्ब्लीचा सदस्य व पंतप्रधान या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर येईल. इम्रान खान हे या खटल्यात मागील तीन वर्षांपासून दूर पळत आहेत. त्याचप्रमाणे ते फॉरेन फंडिंग केस खटल्यापासून सहा वर्षे व इतर खटल्यांपासून दोन वर्षांपासून पलायन करीत आहेत.