घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 03:13 PM2018-11-14T15:13:57+5:302018-11-14T15:54:19+5:30
काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे.
नवी दिल्ली - काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना सांभाळताना पाकिस्तानच्या नाकीनऊ येत आहेत, तिथे काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित करत आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच काश्मीर भारतालाही न देता त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी,अशी मागणी करत आफ्रिदीने अकलेचे तारे तोडले आहेत.
एका पत्रकार परिषदेदरम्यान, आफ्रिदीने हे विधान केले असून, त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील जनतेला सांभाळताना पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. तिथे हे काश्मीरला काय सांभाळणार? असे आफ्रिदीने म्हटले आहे.
काश्मीर प्रश्नावर वारंवार आपले मत मांडणाऱ्या आफ्रिदीने यावेळी केलेले वक्तव्य पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरू शकते. काश्मीर हा काही प्रश्न नाही. मी म्हणतो, ''पाकिस्तानला काश्मीर नको, भारतालाही काश्मीर देऊ नका, काश्मीरला वेगळ्या देशाचा दर्जा द्या. म्हणजे कमीत कमी तेथील माणुसकी तरी जिवंत राहील. जी माणसं मरताहेत ती तरी मरणार नाहीत ना.''
आफ्रिदीने काश्मीरबाबत वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा आफ्रीदीने आपल्या वक्तव्यातून भारतावर टीका केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात भारतीय लष्कराने ठार मारलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर, राजकीय नेते आणि मान्यवरांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.