पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 05:08 PM2017-07-29T17:08:05+5:302017-07-29T17:31:48+5:30
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे.
लाहोर, दि. - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधु शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहीद अब्बासी पंतप्रधानपदाची जबाबदारी संभाळतील. त्यानंतर शहाबाज शरीफ पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेतील. नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पीएमएल-एन पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या. त्यात पक्षातील नेत्यांनी शहाबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली. नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडे संसदेत बहुमत असल्याने तूर्तास तरी सरकारला कुठलाही धोका नाही.
शाहीद अब्बासी पुढचे 45 दिवस पाकिस्तानचे पंतप्रधान असतील. सध्याच्या सरकारमध्ये अब्बासी पेट्रोलियम मंत्री आहेत. याआधी पीएमएल-एनचे नेते आणि शरीफ कुटुंबियांचे माजी संरक्षण मंत्री ख्वाजा महोम्मद असीफ यांना पंतप्रधानपदी बसविण्यावर एकमत झाले होते. पण आता शाहीद अब्बासी यांची निवड झाली आहे.
नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले आहे.
नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी पंतप्रधान व्हावे, अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅशनल असेंब्लीचे ते सदस्य नसल्याने त्यांना लगेचच पंतप्रधान होता येणार नाही. त्यामुळे शाहबाझ नॅशनल असेंब्लीवर निवडून येईपर्यंत नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्याकडे सूत्रे सोपवावीत, असा विचार पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षामध्ये सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.
नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.