‘शरीफ यांना न्यायालयात खेचणार’
By admin | Published: September 8, 2014 03:35 AM2014-09-08T03:35:18+5:302014-09-08T03:35:18+5:30
पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफचे नेते इम्रान खान यांनी त्यांना खोटे बोलल्याबद्दल न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे
इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजकीय पातळीवर उसंत मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, कारण पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफचे नेते इम्रान खान यांनी त्यांना खोटे बोलल्याबद्दल न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध व लष्करासंदर्भात शरीफ खोटे बोलल्याचा खान यांचा आरोप आहे.
शरीफ राजीनामा देत नाहीत तोपर्यंत संसदेसमोर धरणे आंदोलन सुरूच राहील, असे खान यांनी शनिवारी आंदोलकांसमोर बोलताना म्हटले. खान म्हणाले, ‘‘नवाज शरीफ पीटीआय, पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी) व लष्कराच्या संदर्भात संसदेत खोटे बोलले म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे या मागणीसाठी आमचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. आमचा पक्ष व मौलाना ताहीरूल कादरी यांना बदनाम करण्यासाठीच शरीफ खोटे बोलले आहेत.’’ २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने (एन) गैरप्रकार केल्याचा खान यांचा आरोप असून त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इम्रान खान आणि ताहिरूल कादरी यांची विरोधी पक्षनेत्यांना मध्यंतरी भेटही घेतली होती.
गेल्या ३ आठवड्यांपासून खान व कादरी यांचा पक्ष धरणे आंदोलन करीत आहे. शरीफ यांचा राजीनामा व नव्याने निवडणुका घेण्याची मागणी मान्य झालीच पाहिजे, असा विरोधकांचा आग्रह आहे. (वृत्तसंस्था)