शरीफ यांनी उकरला पुन्हा ‘काश्मीर मुद्दा’
By admin | Published: August 14, 2014 11:23 PM2014-08-14T23:23:02+5:302014-08-15T00:15:57+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. काश्मीरच भारत-पाक संबंधातील तणावाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगत त्यांनी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याचे नवे मार्ग शोधण्यासाठी या मुद्यावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी केली.
इस्लामाबादेत मध्यरात्रीनंतर स्वातंत्र्यदिन संचलनाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आम्हाला काश्मीरवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. तणावाचा हा मुख्य स्रोत दूर करून पाक-भारत त्यांच्यातील संबंधांना अधिक चालना देण्याचे नवे मार्ग शोधू शकतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर भारताविरुद्ध छुपे युद्ध खेळत असल्याचा आरोप केल्यानंतर उभय देशांत झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर शरीफ यांचे हे वक्तव्य आले.
‘शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे प्रधान तत्त्व आहे’, असे शरीफ म्हणाले. अशांतता आणि पाक हे समीकरण झालेले असताना शरीफ यांनी आमचा देश हा शांततापूर्ण असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)