शरीफ, मरियम यांना तुरुंगात बी श्रेणीच्या सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:13 AM2018-07-15T04:13:19+5:302018-07-15T04:13:49+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांना बी श्रेणीची सुविधा देण्यात आली आहे. लाहोर विमानतळावर त्यांना अटक करण्यात आल्यानंतर विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले व पोलिसांच्या सुरक्षेत वेगवेगळ्या वाहनांमधून त्यांना आदियाला तुरुंगात नेण्यात आले.
नवाज शरीफ व मरियम यांना अटक करण्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या. त्यात ५० जण जखमी झाले असून, यात २० पोलिसांचा समावेश आहे. शरीफ आणि त्यांच्या मुलीला शरीफ यांना १० वर्षांची तर, मरियम यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरीफ कुटुंबीयांचे लंडनमध्ये चार लक्झरी फ्लॅट असल्याचे उघड झालेले आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्च्यात हजारो समर्थक सहभागी झाले होते. शरीफ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर विमानतळाकडे जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. विमानतळापासून पाच किमी अंतरावर पीएमएल-एनची मोर्चा थांबविण्यात आला. यात सहभागी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना तेथून पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या योजनेनुसार अधिकाºयांनी माजी पंतप्रधान शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना आदियाला तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेतला. आदियाला तुरुंगात मॅजिस्ट्रेट आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टरांनीे शरीफ आणि मरियम यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांची प्रकृती चांगली व व्यवस्थित असल्याचे घोषित केले. (वृत्तसंस्था)
>सुसज्ज खोली, पलंग आणि खुर्चीही
ए आणि बी श्रेणीचे कैदी हे सुशिक्षित असतात आणि ते अशिक्षित कैद्यांना शिक्षण देतात. ते मेहनतीचे कामे करत नाहीत. ए आणि बी श्रेणीतील कैद्यांची खोली सुसज्ज असते. यात एक पलंग, एक खुर्ची, एक टी पॉट, एक शेल्फ आदी वस्तू असतात.