शरीफ यांना ओसामाकडून पैसा
By admin | Published: March 2, 2016 03:00 AM2016-03-02T03:00:58+5:302016-03-02T03:00:58+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे.
बेनझीर भुत्तो यांच्याविरुद्धच्या निवडणुकीसाठी नवाझ शरीफ यांनी ओसामाकडून पैसा घेतला होता, असा दावा खालिद ख्वाजा : शहीद-ए-अमन या पुस्तकात करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुख असलेले खालिद ख्वाजा यांच्या पत्नी शम्मा खालिद यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
देशात इस्लामी राजवट आणण्याच्या नवाझ शरीफ यांच्या विधानांमुळे ओसामा बीन लादेन आणि स्वत: खालिद ख्वाजा हे दोघेही त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र शरीफ आपल्या त्या घोषणेपासून दूर गेले, असेही शम्मा खालिद यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
जागतिक जिहाद संकल्पनेचे सर्वेसर्वा अब्दुल्ला आझम यांनी आपले पती ख्वाजा खालिद यांची आणि ओसामा यांची ओळख करून दिली होती. आझम हे पॅलेस्टिनी सुन्नी नेते होते आणि अरब देशातून जिहादी तयार करण्यासाठी त्यांनी मोठा निधी जमा केला होता. त्यांच्यामुळे ओसामा अफगाणिस्तानात आला, याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. खालिद यांच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संघटना रॉ आणि अमेरिकेची सीआयए ही संघटना यांचा हात होता, असा आरोपही पुस्तकात करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)