शरीफ यांच्या कबुलीने पाकचा झाला जळफळाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:39 AM2018-05-15T06:39:56+5:302018-05-15T06:39:56+5:30
मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी कबुली माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिल्याने मुखभंग झालेल्या पाकिस्तानचा जळफळाट झाला.
इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी कबुली माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिल्याने मुखभंग झालेल्या पाकिस्तानचा जळफळाट झाला. सरकार व लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा समिती’ची तातडीने बैठक घेत शरीफ यांना खोटे पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र स्वत: शरीफ यांनी आपण सत्य तेच बोललो व यापुढेही परिणामांची तमा न बाळगता सत्याला वाचा फोडतच राहीन,असे ठामपणे सांगितले.
समितीच्या बैठकीनंतर शरीफ यांनी केलेली विधाने चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत, असा दावा करणारे एक निवेदन प्रसिद्ध केले गेले. त्यात म्हटले गेले की, पदच्युत केलेल्या शरीफ यांनी ठोस पुरावे व वस्तुस्थिती दुलर्क्षित करून अशी वकत्व्ये करावीत हे दुदैर्वी आणि खेदजनक आहे.
मुंबईवर हल्ला करणाºयांना पाकिस्तान पाठीशी घालत असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करून शरीफ यांनी यासंबंधीचा पाकिस्तानमधील खटला १० वर्षे का रेंगाळला आहे, असा सवाल केला होता. याचा संदर्भ देत समितीच्या निवेदनात खटला रेगाळण्याचे खापर भारताच्या माथी फोडण्यात आले. समितीच्या म्हणण्यानुसार भारताने अनेक प्रकारे नकार दिल्याने तपासात अडथळे तर आलेच, शिवाय मुख्य आरोपी अजमल कसाबचे जबाब घेण्याची संधी न देता घाईने त्याला फासावर लटकविल्याने खटल्याची पूर्तता होऊ शकली नाही.
‘डॉन’ वृत्तपत्राने शरीफ यांची वक्तव्ये संदर्भ सोडून चुकीची प्रसिद्ध केली, असे भासविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सोमवारी भ्रष्टाचारविरोधी न्यायालयातील खटल्यासाठी आले असता स्वत: शरीफ यांनी आपण जे बोललो तेच प्रसिद्ध झाले आहे, असे स्पष्ट केले. मी सत्य तेच बोललो व यापुढेही परिणामांची तमा न बाळगता सत्य बोलतच राहीन, असे ते ठामपणे म्हणाले. मी जे बोललो तेच याआधी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ, माजी गृहमंत्री रहमान मलिक, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) मेहमूद दुर्रानी यांनीही सांगितले आहे. मला खोटे पाडून माध्यमांकरवी मला देशद्रोही ठरविण्याचा खटाटोप केला जात आहे. बोलतो म्हणून मी राष्ट्रद्रोही असेन तर देशाचे तुकडे पाडणारे, राज्यघटनेची लक्तरे करणाºयांना काय देशप्रेमी म्हणायचे? असा सवालही शरीफ यांनी उपस्थित केला.
>स्वत:चा पक्ष आणि भावानेही हात झटकले
सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने नवाज शरीफ सत्तेतून गेले असले तरी त्यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज हा पक्ष अजूनही सत्तेवर आहे. शक्तिशाली आणि सक्रिय लष्कराची नाराजी ओढवून घेणे कोणत्याही सत्ताधारी पक्षाला परवडणारे नसल्याने पक्षाने व पक्षाचे अध्यक्ष असलेले शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांनी शरीफ यांनी केलेली वक्तव्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेही अमान्य असल्याचे सांगून हात झटकले.