शरीफ यांनी आळवला पुन्हा ‘काश्मीर’ राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 04:15 AM2016-09-22T04:15:54+5:302016-09-22T05:56:19+5:30
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीर मुद्या उपस्थित करत तडफदार तरुण नेता अशा शब्दात हिज्बुल मुजाहिनचा कमांडर बुऱ्हान वनीचे उदात्तीकरण केले.
संयुक्त राष्ट्र : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीर मुद्या उपस्थित करत तडफदार तरुण नेता अशा शब्दात हिज्बुल मुजाहिनचा कमांडर बुऱ्हान वनीचे उदात्तीकरण केले. जम्मू-काश्मीरसह सर्व प्रलंबित वादावर शांततामय तोडगा काढण्यासाठी भारतासोबत चर्चेची तयारी दाखवली.
आमसभेतील वीस मिनिटांच्या भाषणात ते काश्मीर आणि खोऱ्यातील सद्य: स्थितीवरच अधिक वेळ बोलले. काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाचा मागणीला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सत्यशोधन मोहिमेद्वारे काश्मिरातील हत्यांची स्वतंत्र चौकशी करावी. तसेच अत्याचार करणारांना शिक्षा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेली आंदोलने आणि अशांततेबद्दल भारतावर आरोप केले. काश्मिरातील अशांततेमागे पाकच असल्याचा आरोप भारताने वेळोवेळी केलेला आहे. ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या बुऱ्हान वनीचा उल्लेख तर शरीफ यांनी युवा नेता असा केला.