पीओकेमध्ये शरीफांचा पक्ष विजयी
By admin | Published: July 23, 2016 05:32 AM2016-07-23T05:32:40+5:302016-07-23T05:32:40+5:30
पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षाने घवघवीत यश मिळविले.
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षाने घवघवीत यश मिळविले. ४१ पैकी ३० जागा जिंकून या पक्षाने दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले आहे.
पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेची बुधवारी निवडणूक घेण्यात आली. २६ राजकीय पक्षांचे ४२३ उमेदवार रिंगणात होते. या विधानसभेत सध्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सरकार आहे. मतदारांनी पीपीपीला नाकारले असून, त्यांचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक- ए- इन्साफलाही दोन
जागा मिळाल्या, तर मुस्लिम कॉन्फरन्सने तीन जागांवर बाजी मारली. पीएमएल-एन, पीपीपी आणि पीटीआय या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांत अटीतटीची लढत होईल, असे मानले जात होते. तथापि, पीएमएल-एनने एकहाती निवडणूक जिंकून राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित केले. (वृत्तसंस्था)
>संपूर्ण प्रक्रिया पाकिस्तानातच
पाकव्याप्त काश्मिरातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २६ लाख ७५ मतदारांनी मतदान केले. पाकव्याप्त काश्मिरात १९७५ मध्ये विधानसभेची स्थापना झाल्यानंतरची ही नववी विधानसभा असेल. विधानसभेचे क्षेत्र केवळ १४,२४५ चौरस किलोमीटर असले तरी निवडणूक प्रक्रिया या क्षेत्रापुरती मर्यादित नाही. ही प्रक्रिया संपूर्ण पाकिस्तानात होते.
कारण, ४१ पैकी १२ सदस्यांची निवड देशाच्या विविध भागात राहणारे ४,३८,८८४ मतदार करतात. लष्कराच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. काही मतदान केंद्रांवर पीएमएल-एन आणि पीटीआयच्या कार्यकर्त्यांत झटापट झाल्याची वृत्ते असून, यात पाच जण जखमी झाले आहेत.