शरीफांना केला फोन; कोंडी फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 14, 2015 12:37 AM2015-02-14T00:37:55+5:302015-02-14T00:37:55+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या घडामोडीकडे उभय देशांतील ठप्प राजनैतिक चर्चेच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
मोदी यांनी शरीफ यांच्यासह आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भाग घेत असलेल्या इतर सार्क देशांच्या प्रमुखांना दूरध्वनी करून विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. संबंध आणखी मजबूत बनविण्यासाठी आपण नवे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना सार्क देशांच्या दौऱ्यावर पाठविणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदी यांच्या दूरध्वनीपूर्वी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांशी दूरध्वनीवर चर्चा केली होती.
मोदी यांनी शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करणे आणि परराष्ट्र सचिव पाठविणार असल्याचे सांगणे यावरून ते पावले पुढे टाकण्यास तयार असल्याचे दिसते, असे पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही चर्चा लवकर सुरू करू इच्छितो; परंतु ती बिनशर्त असावी असे आम्ही यापूर्वीच भारताला कळविलेले आहे. पाकिस्तानचा हा दृष्टिकोन बहुधा मान्य केला गेला असावा, असे दिसते. भारताचे परराष्ट्र सचिव जेव्हा दौऱ्यावर येतील तेव्हा सर्व मुद्यांवर चर्चा केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला. मोदी यांनी सकाळी शरीफ यांना दूरध्वनी करून भारताचे परराष्ट्र सचिव पाकचा दौरा करणार असल्याचे कळविले, असे शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान शरीफ यांनी २७ मे २०१४ रोजी भारतीय पंतप्रधानांशी झालेल्या भेटीच्या स्मृतींना उजाळा देत सर्व मुद्यांवर चर्चेसाठी भारतीय परराष्ट्र सचिवांच्या पाकिस्तान दौऱ्याचे स्वागत केले. मोदींनी एस. जयशंकर सार्क देशांना भेटी देणार असून ते पाकला येणार असल्याचे शरीफ यांना सांगितले. उभय देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चेच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केली होती. त्यावर आक्षेप घेत भारताने ही चर्चाच रद्द केली होती. तेव्हापासून उभय देशांतील चर्चा प्रक्रिया ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे. (वृत्तसंस्था)