शरीफ यांच्या पदरी निराशा

By admin | Published: October 24, 2015 03:07 AM2015-10-24T03:07:22+5:302015-10-24T03:07:22+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी

Sharif's posthumous disappointment | शरीफ यांच्या पदरी निराशा

शरीफ यांच्या पदरी निराशा

Next

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला.
काश्मीर प्रश्नावर अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानने ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्याच्या पाकिस्तानने दिलेल्या आश्वासनाला अमेरिकेने ‘नवे पाऊल’ म्हटले आहे.
बराक ओबामा आणि नवाज शरीफ यांच्यात गुरुवारी चर्चा झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, ‘‘दीर्घकाळपासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी करीत आहे. परंतु ओबामा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही त्यासाठी तयारी दाखविली तरच ते त्यास तयार होतील.’’ ओबामा-शरीफ यांच्या चर्चेत नियंत्रण रेषेवरील निगराणीसाठी ज्या प्रकारच्या व्यवस्थेचा उल्लेख संयुक्त निवेदनात आहे त्याबद्दलही हा अधिकारी म्हणाला, की त्यासाठीदेखील ते दोन्ही देश तयार असले पाहिजेत. भारत आणि पाकिस्तानने आपापसांतील प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडविले पाहिजेत.
ओबामा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरीफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,‘‘काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा होत नसल्यामुळे अशा परिस्थितीत तिसऱ्या देशाने भूमिका बजावली पाहिजे. जर भारत यासाठी तयार नसेल तर त्यामुळे अडथळा निर्माण होईल.’’ पाकिस्तानविरोधात जे दहशतवादी गट होते त्यांच्यावर त्याने राष्ट्रीय कार्य योजनेअंतर्गत कारवाई केली. आता त्याने त्याच प्रकारे ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे.

अणुकरारावर चर्चा नाहीच
ओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पाकिस्तानशी १२३ करारांवर कोणतीही चर्चा केली नाही. आम्ही नागरी अणु निर्यात करण्यासाठी अणुपुरवठा समूहात पाकिस्तानसाठी सूट मागणार नाही. अमेरिका पाकिस्तानशी अण्वस्त्रे करार करणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वृत्तात जे म्हटले ते अजिबात खरे नाही, असे हा अधिकारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला.
अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या १२३ कराराला भारत-अमेरिका अणुकरार म्हटले जाते व त्याची रूपरेषा २००५ मध्ये तयार केली गेली होती. ओबामा व शरीफ यांनी पाकमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली. हा अधिकारी म्हणाला की, आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्याला संभाव्य धोका कोणता आहे याची चांगली जाणीव पाकिस्तानला आहे.

निवेदनातील काश्मीर उल्लेखाकडे भारताचा कानाडोळा
नवी दिल्ली : अमेरिका व पाकिस्तान यांच्या संयुक्त निवेदनातील काश्मीरच्या उल्लेखास फारसे महत्त्व देणे भारताने शुक्रवारी टाळले. सोबतच अमेरिकेला दिलेली आश्वासने पाक पाळेल, अशी आशाही व्यक्त केली.
अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्कर-ए-तोयबासह अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर यासंदर्भातील एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले होते.
भारत-पाकने सर्व वादग्रस्त मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि लवचिक धोरण ठेवून चर्चा करावी, अशी अपेक्षा या संयुक्त निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Sharif's posthumous disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.