प्रेमासाठी ती कोस्टारियातून आली पंजाबमध्ये, कुटुंबीय शिकतंय स्पेनिश भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:42 AM2022-03-27T11:42:24+5:302022-03-27T11:42:44+5:30
सुनेसाठी कुटुंबीय शिकत आहे स्पेनिश भाषा
बलवंत तक्षक
चंडीगड : प्रेमात ना भाषेचा अडथळा असतो ना देशाचा, सीमेचा. कोस्टारियातील ग्रेलिनचे पंजाबमधील नीरजसोबत प्रेम जडले आणि १६ हजार कि.मी.चा प्रवास करून ती प्रेमासाठी देशात दाखल झाली. २० मार्चला या दोघांनी गुरुद्वारा साहिब येथे शीख रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केला.
या प्रेमाची सुरुवात झाली फेसबुकवरून. सुरुवातील मैत्री. दोन वर्षांत या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे, या दोन वर्षांत दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. भाषेचे हे अंतर दूर करण्यासाठी त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला. या काळात नीरजने स्पेनिश भाषेचे काही शब्द शिकले, तर ग्रेलिनही हिंदी भाषेतील काही शब्द समजू लागली. नीरजने लग्नाबद्दल विचारताच तिने आपला होकार दिला. तिच्या कुटुंबानेही होकार दिला.
संस्कृती आणि संस्कार भावले
प्रियकराला भेटण्यासाठी ती कोस्टारियाहून एकटीच निघाली. दिल्लीला विमानाने दाखल झाली. त्यानंतर पंजाबमध्ये आली. नीरज सांगतात की, कोरोना काळात आंतरराष्ट्रीय विमाने बंद नसती तर आमचे लग्न सहा महिने अगोदरच झाले असते. आता आमच्या कुटुंबातील सदस्यही स्पेनिश शिकत आहेत. ग्रेलिनही हिंदी- पंजाबी शिकत आहे.
पंजाबची संस्कृती आणि संस्कार ग्रेलिनला खूप भावले आहेत. अमेरिकेत जाऊन आपल्या कुटुंबाला भेटण्याची तिची इच्छा आहे. त्यानंतर नेहमीसाठीच ती पंजाबला येणार आहे. ग्रेलिनचे वडील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. घरी आई, बहीण आहेत. ग्रेलिन एका खासगी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत. पण, लग्नासाठी तिने ही नोकरी सोडली.