२३ वर्षानंतर ती पहिल्यांदाच जेवली; झो सॅडलरचे शरीराचे अन् आरोग्याचे वाजले बारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:41 AM2022-06-03T07:41:03+5:302022-06-03T07:41:10+5:30

इंग्लंडमधील २४ वर्षीय झो सॅडलरचे खाण्या-पिण्याचे इतके नखरे आहेत की, काही विचारूच नका...

She eat food for the first time in 23 years | २३ वर्षानंतर ती पहिल्यांदाच जेवली; झो सॅडलरचे शरीराचे अन् आरोग्याचे वाजले बारा

२३ वर्षानंतर ती पहिल्यांदाच जेवली; झो सॅडलरचे शरीराचे अन् आरोग्याचे वाजले बारा

Next

इंग्लंडमधील २४ वर्षीय झो सॅडलर हिने गेल्या २३ वर्षांत  जेवणच केलेलं नाही, हे पटतं तुम्हाला? पण ते खरं आहे!कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. पण आपण काय खातो, यावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं, हे मात्र तितकंच खरं. आयुर्वेदानं तर आपल्या आरोग्यात सर्वाधिक महत्त्व आहारालाच दिलं आहे.

आपला आहार सुधारला, योग्य आणि आवश्यक ते सारे अन्नघटक हव्या त्या प्रमाणात शरीरात गेले तर आरोग्य उत्तम राहतं, हे विज्ञानानंही सिद्ध केलं आहे. तरीही अनेकजणांचं घोडं खाण्या-पिण्याच्या बाबतीतच पेंड खातं हे खरं आहे. ‘मला हे नको, ते नको, हे तर मला आवडतच नाही...’ असे अनेकांचे नखरे असतात. या नखऱ्यांचे दुष्परिणाम नंतर त्यांना भोगावेही लागतात. 

इंग्लंडमधील २४ वर्षीय झो सॅडलरचे खाण्या-पिण्याचे इतके नखरे आहेत की, काही विचारूच नका... या नखऱ्यांचं प्रमाण कुठपर्यंत जावं? - गेल्या २३ वर्षांत तिनं जेवणच केलेलं नाही! मग ही बया मग खाते तरी काय आणि जगते तरी कशी? गेली २३ वर्ष ती फक्त बटाटा चिप्स आणि सँडविच खाऊनच जगते आहे. त्याशिवाय दुसरं काही तिला आवडत तर नाहीच, पण खाण्याचा प्रयत्न सोडा, इतर खाद्यपदार्थांचा साधा वास जरी आला तरी तिला मळमळतं आणि ती आजारी पडते. 

लहानपणी सर्वात पहिल्यांदा जेव्हा तिनं पोटॅटो चिप्स खाल्ले, त्यावेळी तिला ते इतके आवडले की, नंतर तेच तिचं जेवण झालं. झो हिनं इतर खाद्यपदार्थही खावेत, यासाठी तिच्या आई-वडिलांनी जंग जंग पछाडले, नाना प्रयत्न करून पाहिले, पण झो कशालाही बधली नाही. ती उपाशी राहिली, पण तिनं इतर कोणत्याही अन्नपदार्थांना तोंड लावलं नाही. त्यातल्या त्यात झोची आई एकच खाद्यपदार्थ तिच्या गळी उतरवू शकली, तो म्हणजे सँडविचेस. त्यामुळे आजपर्यंत चिप्स आणि सँडविच हे दोन खाद्यपदार्थ खाऊनच ती जगली आहे. 

झो पोटॅटो चिप्सची रोज दोन पाकिटं खाते. त्यातही तिच्या आवडीचा फ्लेवर असेल तरच या चिप्सही ती खाते. नाहीतर उपाशी राहणंच पसंत करते. पण जंकफूड का असेना, पोटात काहीतरी गेलं पाहिजे, आपली मुलगी जगली पाहिजे, या विचारानं तिचे पालक म्हणतात, ‘बाई, चिप्स तर चिप्स, पण काहीतरी खा.’ तिच्या खाण्या-पिण्यावरून बोलणं कित्येक वर्ष झाली त्यांनी सोडून दिलं आहे. 

अर्थातच असल्या खाण्यानं झोच्या शरीराचे आणि आरोग्याचे बारा वाजले आहेत. पण त्याचं तिला काही सोयरसूतक नाही. ‘इतर काही मी खाऊच शकत नाही, तर करणार काय?’ हा तिचा सडेतोड सवाल! नाही म्हणायला गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या नेहमीच्या ‘जेवणापेक्षा’ वेगळा अन्नपदार्थ टेस्ट करून पाहिला. झो काहीच का खात नाही, म्हणून सुरूवातीला झोच्या पालकांनी तिच्या लहानपणी अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवले होते, पण त्यानंही काही फरक पडला नव्हता. 

तीन वर्षांपूर्वी तिच्या परत काही तपासण्या केल्या, तेव्हा आढळून आलं की, झोला ‘मल्टिपल सेराॅयसिस’ उर्फ ‘अव्हॉयडंट रिस्ट्रीक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर’ (ARFID) नावाचा आजार झाला आहे. या आजाराला ‘नियोफोबिया’ असंदेखील म्हटलं जातं.  हा आजार होणाऱ्या लोकांची संख्या जगभरात अतिशय कमी आहे. पण ज्यांना हा आजार होतो, ते कायम एकाच प्रकारचं अन्न खातात.  दुसरं  काही खाल्लं किंवा खाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना प्रचंड भीती वाटते. झोच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. पण सतत जंकफूड खाल्ल्यानं झोला घातक अशा शारीरिक आणि मानसिक विकारांना सामोरं जावं लागेल, असं डॉक्टरांनी बजावल्यावर तिला आता धक्का बसला आहे. त्यामुळे तिनं आता संमोहनतज्ज्ञांची मदत घ्यायचं ठरवलं आहे.

स्वत:च्या लग्नात घेणार पूर्ण जेवण!
प्रसिद्ध हिप्नोथेरपिस्ट डेव्हिड किलमुरी यांनी काही दिवसांपूर्वीच झोला तब्बल दोन तास संमोहनावस्थेत नेलं आणि काही पदार्थ तिला टेस्ट करायला लावले. त्यात काही फळं, ग्रेव्ही असलेल्या भाज्या यांचा समावेश होता. खऱ्या अर्थानं तिच्या आयुष्यातलं हे तिचं पहिलं ‘पूर्ण जेवण’! डेव्हिडच्या मदतीनं ती आता इतरही काही पदार्थ खाऊन बघण्याचा प्रयत्न करते आहे. झो पुढील वर्षी लग्न करणार आहे. निदान आपल्या लग्नात तरी जंकफूड खाण्यापेक्षा ‘पूर्ण जेवण’ करावं, तेही आनंदानं, असा तिचा मानस आहे.

Web Title: She eat food for the first time in 23 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न