चक्रीवादळानंतर १९ वर्षांनी ‘ती’ सापडली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:05 AM2024-06-13T11:05:40+5:302024-06-13T11:05:52+5:30

Cyclone News: अमेरिकेवर धडकलेल्या प्राणघातक चक्रीवादळांपैकी एक असलेले कॅटरिना. ते आलं होतं सन २००५ मध्ये. या चक्रीवादळात १३९० लोक मृत्युमुखी पडले होते. या चक्रीवादळासोबत ‘ती’ही गुडूप झाली होती. पण, आज १९ वर्षांनंतर तिचा शोध लागला आहे. ‘ती’च्या कुटुंबीयांच्या एका डोळ्यात आसू, तर एका डोळ्यात हासू, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

'She' was found 19 years after the cyclone, but... | चक्रीवादळानंतर १९ वर्षांनी ‘ती’ सापडली, पण...

चक्रीवादळानंतर १९ वर्षांनी ‘ती’ सापडली, पण...

अमेरिकेवर धडकलेल्या प्राणघातक चक्रीवादळांपैकी एक असलेले कॅटरिना. ते आलं होतं सन २००५ मध्ये. या चक्रीवादळात १३९० लोक मृत्युमुखी पडले होते. या चक्रीवादळासोबत ‘ती’ही गुडूप झाली होती. पण, आज १९ वर्षांनंतर तिचा शोध लागला आहे. ‘ती’च्या कुटुंबीयांच्या एका डोळ्यात आसू, तर एका डोळ्यात हासू, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

ऑगस्ट २००५ मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी खोऱ्यातील बिलोक्सी या छोट्या शहरात टोनेट जाक्सन ही ४६ वर्षीय महिला राहत होती.  कॅटरिना चक्रीवादळात ती तिच्या पतीसह अडकली होती. लुईझियाना आणि मिसिसिपीमध्ये बेपत्ता झालेल्या १२,००० लोकांपैकी टोनेट एक होती. टोनेट पाण्यात वाहून गेली होती. तिचं प्रेतही सापडलं नव्हतं, तेव्हापासून टोनेटचं गायब होणं हे तिच्या कुटुंबीयांसाठी एक गूढ बनलं होतं, पण ऑथ्रम (फाॅरेन्सिक जेनेटिक जेनेलोजी कंपनी) नावाच्या संस्थेने डीएनए टेस्ट, फोरेन्सिक लॅब आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोनेटचं सत्य शोधून काढलं आहे.

वादळ आलं, तेव्हा टोनेट पती हार्डी जाक्सनसोबत घराच्या वरच्या मजल्यावर पोटमाळ्यावर चढली होती, पण  काही वेळानंतर पाणी एवढं वाढलं की, पाण्याशिवाय दुसरं काही तिथे दिसतच नव्हतं. हार्डीने टोनेटचा हात घट्ट पकडून ठेवला होता, पण आता आपलं काही खरं नाही, हे लक्षात येताच टोनेटने हार्डीचा हात सोडला.  ‘आपल्या मुलांची, नातवंडांची काळजी घे’, अशी विनंती त्याला केली. काही कळायच्या आत हार्डीच्या डोळ्यादेखत टोनेट पाण्यात वाहून गेली. काही वेळातच हार्डी पण पाण्यात वाहून गेला, पण तो पुढे एका झाडाला लटकला आणि स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी झाला. पण, टोनेटचा काही ठावठिकाणाच लागला नाही.

हार्डी आणि त्याच्या कुटुंबीयांनी टोनेटचा खूप शोध घेतला, पण काही उपयोग झाला नाही. कॅटरिनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शोध आणि बचाव पथकाला बिलोक्सीपासून कित्येक मैल दूर असलेल्या एका ठिकाणी दोन घरांच्या मध्ये पडलेल्या राडारोड्यात एक मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्यांनी त्याचं वर्णन एक कृष्णवर्णीय महिला, वय पन्नास, उंची ५.१ ते ५.५. फुटांदरम्यान असं निरीक्षण नोंदवलं.  पण, याचा पुढे लगेच पाठपुरावा झाला नाही. ओळख न पटल्याने त्या शोध अधिकाऱ्यांनी त्या मृतदेहाला जेन (लव्ह) हे नाव दिलं. या नावानेच स्मशानभूमीत मृतदेहाचं दफनही केलं. आता एवढ्या वर्षांनंतर जेन म्हणजेच टोनेट जाक्सन हे सत्य तिच्या कुटुंबीयांना समजलं आहे.

स्मृतिस्थळावर कोरलेले जेनचं नाव, माहिती वाचून ही आपली बहीण टोनेट आहे, याची खात्री तिच्या बहिणीला पटली. घटनेनंतर हार्डीने अनेकदा प्रलयाच्या दिवशी काय झालं होतं, सगळे जण कुठेकुठे होते, याची माहिती शोध अधिकाऱ्यांना दिली होती. शासकीय कार्यालयात त्याच्या नोंदी होत्या. आपल्या पत्नीचा त्याने अनेकदा शोधही घेतला. त्या नोंदींचा आधार घेत प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. पुढच्या दशकात डीएनए तंत्रज्ञानातील मोठ्या प्रगतीने गुंतागुंतीच्या, कोडं न सुटलेल्या गुन्ह्यांमध्ये आणि हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं. मिसिसिपीमध्ये, ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स  कार्यालयाने दखल घेत टोनेट आणि इतर प्रकरणांचा शोध लावला. केसेस हातावेगळ्या केल्या.

२०२३ मध्ये, त्या एजन्सींच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा बिलोक्सीच्या उत्तरेकडील त्या दोन स्लॅबमध्ये सापडलेल्या अज्ञात कॅटरिनापीडितेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांनी जेनचे अवशेष बाहेर काढले आणि ते टेक्सासमधली कंपनी ऑथ्रमकडे पाठवले. या कंपनीने फॉरेन्सिक डीएनए विश्लेषण आणि कौटुंबिक माहिती यांची पडताळणी करत सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.

ऑथ्रम संस्थेने काढलेले निष्कर्ष, जमवलेली माहिती आणि टोनेट जाक्सनच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याची अतिरिक्त डीएनए चाचणी, त्याचे निकाल याची पडताळणी करून टोनेटचं सत्य तिचे कुटुंबीय आणि जगासमोर आणलं. १९ वर्षांनंतर, विज्ञानाने हे प्रकरण उघडकीस आणून टोनेटच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देण्याचं काम केलं आहे.

...पण हे हार्डीला मात्र कळणार नाही!
पत्नीला दिलेल्या वचनाप्रमाणे हार्डीने त्याच्या  मुलांची आणि नातवंडांची काळजी घेतली. आपण आणि आपले कुटुंबीय आपल्या प्रिय पत्नीला तिच्या मृत्यूनंतर योग्य अंत्यसंस्कार देऊ शकले नाही, याची खंत त्याला कायम वाटायची. ही खंत मनात ठेवूनच २०१३ मध्ये हार्डीचंही निधन झालं. जेव्हा टोनेटचं सत्य तिच्या कुटुंबीयांना समजलं, तेव्हा ही बाब हार्डी जिवंत असताना त्याला समजायला हवी होती, असं वाटून प्रत्येक जण हळहळत राहिला.

Web Title: 'She' was found 19 years after the cyclone, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.