"अजूनही जिवंत आहे, तर नक्कीच काहीतरी मोठं काम करायचंय...", शेख हसीना यांनी समर्थकांना केलं संबोधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:49 IST2025-02-06T08:48:08+5:302025-02-06T08:49:37+5:30
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले आहे.

"अजूनही जिवंत आहे, तर नक्कीच काहीतरी मोठं काम करायचंय...", शेख हसीना यांनी समर्थकांना केलं संबोधित
बांगलादेशात अजूनही हिंसाचार सुरु आहे. बुधवारी मध्यरात्री बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. आंदोलकांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या धनमोंडी-३२ येथील निवासस्थानाला आग लावली. तसेच, त्यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. दरम्यान, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले आहे.
शेख हसीना म्हणाल्या की, बांगलादेशात माझ्याविरुद्ध सुरू झालेले आंदोलन प्रत्यक्षात मला मारण्यासाठी आहे. मोहम्मद युनूस यांनी मला आणि माझ्या बहिणीला मारण्याची योजना आखली होती. तसेच, जर या हल्ल्यांनंतरही अल्लाहने मला जिवंत ठेवले असेल तर मला काहीतरी महत्त्वाचे काम करायलाच हवे. जर असं नसतं तर मी इतक्या वेळा मृत्यूवर कशी मात केली असती? असा सवाल शेख हसीना यांनी केला.
शेख हसीना यांनी आपल्या भाषणात स्वत:च्या निवासस्थानावरील हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, घर का पेटवण्यात आले? मी बांगलादेशातील लोकांकडून न्यायाची मागणी करते. मी माझ्या देशासाठी काहीच केले नाही का? मग इतका अपमान का? असे प्रश्न शेख हसीना यांनी केले. तसेच, झालेल्या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या आणि माझ्या बहिणीच्या ज्या काही आठवणी शिल्लक होत्या, त्या आता पुसल्या गेल्या आहेत. घरे जाळता येतात, पण इतिहास पुसता येत नाही.
#WATCH | An angry mob vandalized the memorial and residence of Bangladesh’s founding father, Sheikh Mujibur Rahman, located at Dhanmondi 32 in Bangladesh, demanding a ban on Awami League - the party he founded. (05.02.2025) pic.twitter.com/5rVLXot6f1
— ANI (@ANI) February 6, 2025
बुलडोझरने बांगलादेशचा इतिहास पुसला जाणार नाही
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या भाषणात म्हटले की, लाखो शहीदांच्या प्राणांच्या किंमतीवर आपण मिळवलेले राष्ट्रध्वज, संविधान आणि स्वातंत्र्य बुलडोझरने उध्वस्त करण्याची आणि नष्ट करण्याची ताकद त्यांच्यात अजूनही नाही. ते घर पाडू शकतात, पण इतिहास नाही. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास आपला बदला घेतो. बुलडोझरने इतिहास पुसता येत नाही.