आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:03 PM2024-08-05T16:03:59+5:302024-08-05T16:09:38+5:30
Bangladesh Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.
Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. शेख हसीना लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. आरक्षणावरून महिनाभर सुरू असलेल्या गदारोळानंतर अशी वेळ आली की हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेशात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलक पंतप्रधान कार्यालयात घुसले. देशातील परिस्थिती पाहून लष्करानेच हसीनाचा राजीनामा मागितला होता. लष्करप्रमुखांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर हसीना यांनी देशातून पलायन केलं.
बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून आरक्षणाविरोधात हिंसक आंदोलन सुरू होते. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंदोलकांशी कठोरपणे वागण्यास सुरुवात केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. त्यानंतर रविवारी झालेल्या हिंसाचारात ९८ लोकांचा बळी गेला. त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी हसीना यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यामुळे शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. मात्र शेख हसीना इथपर्यंत कशा पोहोचल्या आणि त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाऊन घेऊया...
२८ सप्टेंबर १९४७ रोजी जन्मलेल्या शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. हसीना यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथे गेले. तिथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. यानंतर त्या काही काळ सेगुन बगीचा येथे राहत होत्या. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी ढाका येथे स्थलांतरित झाले.
राजकारणात कशा आल्या?
शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हता. १९६६ मध्ये जेव्हा त्या ईडन महिला महाविद्यालयात शिकत होत्या, तेव्हा त्यांना राजकारणाविषयी उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. यानंतर त्यांनी वडील मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीग या विद्यार्थी संघटनेचे काम हाती त्यांनी हाती घेतले. त्यानंतर बराच ाळ शेख हसीना ढाका विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातही सक्रिय होत्या.
आई वडिलांची हत्या
१९७५ मध्ये बांगलादेशच्या सैन्याने बंड करून हसीना यांच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारले. सशस्त्र सैनिकांनी शेख हसीना यांची आई, तिचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्यावेळी शेख हसीना या पती वाजिद मियाँ आणि लहान बहिणीसोबत युरोपमध्ये होत्या. आई-वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या. त्यानंतर इंदिरा गांधी सरकारने त्यांना भारतात आश्रय दिला. बहिणीसोबत त्या दिल्लीला आल्या आणि जवळपास सहा वर्षे इथेच होत्या.
वडिलांचा पक्ष पुढे नेण्याचा निर्णय
१९८१ मध्ये त्या बांगलादेशला परतल्या. हसीना या विमानतळावर पोहोचल्या तेव्हा लाखो लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर १९८६ मध्ये पहिल्यांदाच त्यानी सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. १९९१ मध्ये बांगलादेशात प्रथमच मुक्त निवडणुका झाल्या. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगला या निवडणुकीतही बहुमत मिळाले नाही. त्यानंतर १९९६ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि सत्तेवर आल्यानंतर शेख हसीना पंतप्रधान झाल्या. २००१ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर, २००९ मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या आणि तेव्हापासून त्या पंतप्रधान होत्या.
दरम्यान, शेख हसीना यांनी दोनदा मृत्यूला चकवा दिला आहे. १९७ मध्ये जेव्हा त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली तेव्हा त्या देशाबाहेर असल्यामुळे योगायोगाने बचावल्या. त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला झाला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला होता.