शेख हसीनांसाठी ब्रिटनची दारे बंद? आश्रयासाठीची नियमावली दाखवत भारतात जाण्यास सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:11 PM2024-08-06T17:11:20+5:302024-08-06T17:16:33+5:30
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा ब्रिटनमध्ये जाण्याचा मार्गही अवघड झाला आहे.
Sheikh Hasina : बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या देशव्यापी हिंसक आंदोलनानंतर सरकार कोसळलं आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेख हसीना या ब्रिटनला जाणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यासाठीच्या हालचालीदेखील सुरु झाल्या होत्या. मात्र आता शेख हसीना पुढील काही दिवस भारताबाहेर जाण्याची शक्यता नसल्याचे समोर आलं आहे. कारण त्यांच्या ब्रिटन दौऱ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ब्रिटनने हसीना यांना नियमावली दाखवत आश्रय देण्यास नकार दिला आहे.
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतात आल्या. त्यानंतर हसीना यांना त्यांची बहीण आणि मुलगा राहत असलेल्या ब्रिटनमध्ये आश्रय घ्यायचा असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता ब्रिटनमधून आश्रयाची आशा बाळगणाऱ्या शेख हसीना यांना धक्का बसला आहे. ब्रिटनने आमचे इमिग्रेशनचे नियम कोणत्याही व्यक्तीला आश्रयासाठी येण्यास किंवा तात्पुरते राहण्याची परवानगी देत नाहीत, असं म्हटलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने ज्या देशात तुम्ही आधी सुरक्षितपणे पोहोचला होतात तिथेच आश्रय घ्या असेही सांगितले होते. त्यामुळे शेख हसीना या भारतातच थांबल्या असल्याचे म्हटलं जात आहे.
पंतप्रधान पद सोडल्यानंतर शेख हसीना या ढाकातून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात आल्या. त्यानंतर शेख हसीना भारतातून ब्रिटनला जाऊ शकतात अशा बातम्या येत होत्या. आतापर्यंत त्या हिंडन एअरबेसवरच थांबल्या होती. काही वेळापूर्वी त्यांना दिल्लीतच सुरक्षित स्थळी नेण्यात आले. मात्र, ब्रिटनकडून मंजुरी न मिळाल्याने शेख हसीना त्यांची बहीण शेख रेहानासोबत भारतात आहेत. भारत सरकारने हसीना यांना त्यांच्या भविष्यातील योजना सांगण्यास सांगितले आहे. हसीना येथे जास्त काळ राहू शकत नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ब्रिटनने इमिग्रेशनच्या नियमांचे कारण देत शेख हसीना यांना भारतात आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता शेख हसीना यांना आता नव्या पर्यायाचा विचार करावा लागेल. ब्रिटन गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं की, "गरजू लोकांना सुरक्षा प्रदान करण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला आहे. पण आमच्या इमिग्रेशन नियमांमध्ये कोणीही आश्रय किंवा तात्पुरता आश्रय मिळवण्यासाठी यूकेमध्ये जाण्याची तरतूद नाही. ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे त्यांनी प्रथम त्याच देशात आश्रयासाठी अर्ज केला पाहिजे जिथे त्यांनी आपला देश सोडला." शेख हसीना यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ब्रिटनमध्ये आश्रय कसा मिळतो?
दरम्यान, ब्रिटनमध्ये आश्रय मिळविण्यासाठी, एखाद्याला यूकेच्या गृहविभागाकडे अर्ज करावा लागतो. आश्रय देणे किंवा अर्ज फेटाळण्याचा अंतिम निर्णय फक्त गृह मंत्रालय घेते. नियमांनुसार, आश्रय घेणाऱ्याचा अर्ज मिळाल्यानंतर, तो आधी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे जातो. स्क्रीनिंग दरम्यान, आश्रय मागणाऱ्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर अहवाल तयार केला जातो. मग शेवटी गृह मंत्रालय निर्णय घेते की आश्रय द्यायचा की अर्ज फेटाळायचा.