१ वर्षात १९ देशांत ३४ जणांबरोबर डेटिंग! 'ती' नेमकं यातून काय शिकली?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:05 AM2023-04-12T06:05:53+5:302023-04-12T06:06:47+5:30
अमेरिकेतील वाॅशिंग्टनची लोनी जेम्स. चाळीस वर्षांची आहे. जोडीदाराच्या शोधात या लोनीने मार्च २०२२मध्ये आपला देश सोडला.
अमेरिकेतील वाॅशिंग्टनची लोनी जेम्स. चाळीस वर्षांची आहे. जोडीदाराच्या शोधात या लोनीने मार्च २०२२मध्ये आपला देश सोडला. गेल्या वर्षभरापासून तिची भटकंती सुरू आहे. आतापर्यंत ती तब्बल १९ देश फिरली, एकूण ३४ डेट्स केल्या. पण, अजूनही तिला तिचा योग्य जोडीदार काही सापडलेला नाही.
लोनीच्या आईला वयाच्या ४८व्या वर्षीच अल्झायमरनं गाठलं. दीड वर्षापूर्वीच ती गेली. अल्झायमरनं आईची संवादशक्ती हिरावून घेण्याआधी लोनीने एकदा तिला आवडलेल्या एका मुलाबद्दल सांगितलं, तेव्हा आई तिला म्हणाली, ‘या मुलाला तुझ्यासारखी फिरण्याची आवड आहे ना, त्याचं तुझ्यासारखंच प्रवासावर प्रेम आहे ना, हे तपासून बघ!’
- तेव्हापासूनच बसल्याजागी आपल्याला हवा तसा जोडीदार मिळणार नाही, असं लोनीच्या मनाने घेतलं. म्हणून मग तिने थेट प्रवासाचाच बेत आखला. उद्देश काय?- तर आपल्या आवडीनिवडींशी जुळणारा जोडीदार शोधणं! ज्या देशात जाऊ तिथल्या स्थानिक व्यक्तीसोबत डेटिंगला जायचं, हे तिच्या मनात पक्कं होतं. त्यासाठी ती पैसे जमवू लागली. राहण्यासाठी तिने पूर्वीपेक्षा स्वस्त अपार्टमेंट शोधली. स्वत: जमवलेल्या अनेक गोष्टी विकून तिने प्रवासासाठी पैसे जमवले. ऑक्टोबर २०२१मध्ये आई निवर्तल्यावर एक डफल बॅग घेऊन लोनी घराबाहेर पडली. टिंडर, हिंज आणि बम्बल या तीन ऑनलाइन डेटिंग ॲप्सचा वापर करून व्यक्ती निवडायची आणि डेटिंग करण्यासाठी त्या व्यक्तीच्या देशात जायचं, हा सिलसिला सुरू झाला. ती आतापर्यंत १९ देशांतील ३४ व्यक्तींबरोबर डेटिंगला जाऊन आली आहे.
अनोळखी देशात ऑनलाइन डेटिंग ॲप्सवर माहिती मिळवून अनोळखी व्यक्तीसोबत डेटिंगला जाणं हे तसं धोक्याचं. पण, लोनीच्या मनाला कधी भीती शिवली नाही. जे अनुभव येतील त्याला सामोरं जायचं, हे तिनं आधीच ठरवलं होतं. या निमित्ताने देश फिरताना तिचा डेटिंगकडे , माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
लोनी सर्वांत पहिल्यांदा लंडनला गेली. टिंडरवर भेटलेल्या फ्रेंच आणि ब्रिटिश असं दुहेरी नागरिकत्व असलेल्या आणि प्रवासावर प्रेम करणाऱ्या तरुणासोबत पबमध्ये आणि मग पाच तासांच्या डिनर डेटवर गेली. तिथे त्या तरुणाने केलेल्या प्रवासाबद्दल पोटभर गप्पा मारल्या आणि त्यांची डेट संपली. इजिप्तमधल्या कैरो येथील एका तरुणासोबत लोनीने १३ तास घालवले. तिची ही सर्वांत दीर्घ डेट. रमजानचाच महिना होता. त्या तरुणाने तिला कैरोतील म्युझियम, बुध्दांचे मठ दाखवले, रिक्षामधून शहर फिरवलं, तिथल्या मुस्लीम संस्कृतीची ओळख करून दिली. रात्री वाळवंटातील लोकनृत्य दाखवलं. त्याच्यासोबत ती इफ्तार पार्टीलाही गेली. तुर्कीमधल्या डेटसमध्ये जेम्सने पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला, तर आर्क्टिक सर्कलमधील डेटदरम्यान मासेमारी केली. इटलीमध्ये एका शास्त्रीय संगीतकाराच्या स्कूटरवरून नाइट टूर केली. प्रत्येक डेटिंगचा अनुभव वेगळा. काही अनुभव तर विचित्र म्हणावे असे मनस्ताप देणारेही होते.
तुर्कस्तानात असताना डेटिंग करणाऱ्या तरुणाची शारीरिक जवळीक लोनीनं नाकारली म्हणून तो प्रचंड चिडला. ‘आत्ता येतो’, असं सांगून गायब झाला. तिने तिथल्या वादळात उभं राहून कित्येक तास त्याची वाट पाहिली. शेवटी अख्खी रात्र तिला त्या दुकानासमोरील बेंचवर काढायला लागली. स्वित्झर्लंडमध्ये एकासोबत डेटवर असताना त्या तरुणाने लोनीला एका महागड्या हाॅटेलात नेलं. तिथे महागडे पदार्थ आणि पेयं मागवली आणि जे भरमसाठ बिल आलं ते दोघांना मिळून भरायला लावलं. यामुळे तिच्या संपूर्ण आठवड्याचं आर्थिक नियोजन पार कोलमडून गेलं. नाना तऱ्हेच्या डेटिंगच्या अनुभवाने लोनीला जगाची ओळख झाली. प्रेम - रोमान्स व्यक्त करण्याच्या विविध पध्दती तिला या डेटिंगच्या प्रवासात अनुभवता आल्या. तिला स्वत:लाही ओळखता आलं. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा सर्वांत जास्त आनंदी आणि सुंदर असतो. मुक्त आणि उत्सुक असतो हे लोनीला समजलं.
योग्य जोडीदार मिळेपर्यंत लोनी असाच प्रवास करत राहाणार आहे. अशीच माणसांना भेटत राहणार आहे. भिन्न समाज आणि संस्कृतीशी एकरूप होऊन जगण्याचा अर्थ समजून घेणार आहे. एका जोडीदाराच्या शोधात लोनीला जे गवसलं, त्याला खरंच मोल नाही!
‘अ डेट इन एव्हरी कंट्री’
लोनी आतापर्यंत ब्रिटन, इजिप्त, जाॅर्डन, सायप्रस,
तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, स्लोव्हेनिया, नाॅर्वे, आइसलॅण्ड, पोर्तुगाल, मोरोक्को, ट्युनेशिया, माॅरेटेनिया, सेनेगल, नामिबिया, साउथ आफ्रिका या देशांमध्ये डेटिंगसाठी फिरली आहे.. या अनुभवांबद्दल ती ‘#adateineverycountry’ या हॅशटॅगसह लिहिते आहे. याचं तिला पुढे पुस्तक काढायचं आहे.