Breaking! प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:18 PM2020-08-28T14:18:48+5:302020-08-28T14:19:34+5:30
गेल्या काही महिन्यांपासून शिंजो अबेंच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू आहेत
टोकियो: जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळेच अबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे यांनी राजीनामा दिल्यानं जपानचा शेअर बाजार कोसळला.
जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. गेल्या आठवड्यात अबे यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यांच्यावर सात तास उपचार झाले. अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत होता. मात्र त्यांनी त्याआधीच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
Shinzo Abe resigns as Japan's Prime Minister, reports news agency Reuters. https://t.co/ZiZAqieyQW
— ANI (@ANI) August 28, 2020
अबे ८ वर्षांपासून पंतप्रधानपदी होते. सर्वाधिक काळ जपानचं नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्यानं जपानमध्ये अबे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली. त्यांच्या पक्षावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. ६५ वर्षांच्या अबे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं. चीनपासून असलेला धोका लक्षात घेता अबे यांच्याकडून सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू होते.