टोकियो विधानसभा निवडणुकीत शिंजो अबेंचा मानहानीकारक पराभव
By admin | Published: July 3, 2017 09:40 PM2017-07-03T21:40:59+5:302017-07-03T21:40:59+5:30
जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा राजधानी टोकियोमधल्या विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाला
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 3 - जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा राजधानी टोकियोमधल्या विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाला आहे. टोकियोच्या मेट्रोपॉलिटन विधानसभा निवडणुकीत यूरिको कोइके यांच्या पार्टीनं जनतेचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या अबेंच्या पक्षाच्या निराशाजनक कामगिरीमुळे जनतेनं त्यांना नाकारलं आहे.
टोकियो विधानसभा निवडणुकीत यूरिको कोइके यांच्या सिटिजन्स फर्स्ट पार्टीनं विधानसभेच्या 127 जागांपैकी 79 जागा जिंकल्या आहेत. तर शिंजो अबेंच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला अवघ्या 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. टोकियो विधानसभेच्या 2012च्या निवडणुकीत अबेंच्या नेतृत्वाखाली पक्षानं 57 जागांवर विजय मिळवला होता. अबेंच्या पक्षाला हे यश या निवडणुकीत टिकवता आलं नाही.
लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशबा यांनीही या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या ऐतिहासिक पराभवाची आम्ही कारणमीमांसा करणार आहोत. टोकियो विधानसभा निवडणुकीत सिटिजन्स फर्स्ट पार्टीच्या विजयापेक्षा हा लिबरल डेमोक्रेटिक पार्टीसाठी मानहानीकारक पराभव आहे. टोकियोची पहिली महिला गव्हर्नर सुश्री कोइके यांनीही पक्षाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच टोकियो विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आमची जबाबदारीची आता वाढली आहे आणि त्याची जाणीव आम्हाला आहे, असंही सुश्री कोइके म्हणाल्या आहेत.