२ हजार कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला समुद्रात जलसमाधी, ३७ पोर्शे कार्सही पाण्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:01 PM2019-03-20T14:01:51+5:302019-03-20T14:05:18+5:30
ब्राझीलला जाणारं इटलीचं एक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं आहे. हे जहाज २ हजार कार्स घेऊन ब्राझीलला जात होतं.
ब्राझीलला जाणारं इटलीचं एक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं आहे. हे जहाज २ हजार कार्स घेऊन ब्राझीलला जात होतं. ज्यात महागड्या ३७ पोर्शे कार्सचा समावेश होता. जहाजातील २७ क्रू मेंबर्सना ब्रिटिश मिलिट्री सुखरूप बाहेर काढले आहे. ग्रांडे अमेरिका नावाच्या या जहाजात ऑडी कंपनीच्याही काही कार्स होत्या. जहाज बुडाल्यानंतरचे काही फोटो समोर आले आहेत.
हे जहाज बुडाल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पोर्शेच्या काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या 911 GT2 RS या मॉडलच्या कारची किंमत ३.८८ कोटी रूपये आहे. या मॉडलच्या चार कार या जहाजात होत्या. यावरूनच अंदाज लावला जात आहे की, किती आर्थिक नुकसान झालं असावं.
(Image Credit : www.dailymail.co.uk)
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्याजवळ हे जहाज अचानक बुडालं. हे जहाज बुडण्यापूर्वी काही वेळीआधी फ्रान्सच्या ब्रेस्टपासून १५० मैल दूर दक्षिण-पश्चिम दिशेने जात होतं. जर्मन कंपनी पोर्शेने आपल्या ग्राहकांना सांगितले की, समुद्रात जहाज बुडाल्यामुळे आता त्यांना त्यांच्या कार्ससाठी वाट बघावी लागणार आहे. कंपनी काही दिवसातच नव्या कारची निर्मिती सुरू करणार आहे.
कंपनीने ग्राहकांना पत्र लिहून सांगितले की, 'आम्हाला हे सांगताना फार वाईट वाटत आहे की, ग्रिमाल्डी ग्रुपचं जहाज जे तुमच्या कार घेऊन होतं, ते १२ मार्च रोजी समुद्रात बुडालं. त्यामुळे तुम्ही ऑर्डर केलेल्या कारची डिलिव्हरी करू शकत नाही'.