"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप
By जयदीप दाभोळकर | Published: January 8, 2021 11:51 AM2021-01-08T11:51:27+5:302021-01-08T11:56:56+5:30
संसेदेतील हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगा फडकावल्याचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल
जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती. या हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगाही दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या हिंसाचारादरम्यान यात भारताचा तिरंगाही दिसत आहे. यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. "ज्यानं कोणी यादरम्यान तिरंगा फडकावला होता त्याला लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या देशांमध्ये होणाऱ्या अशा हिंसाचारामध्ये आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये आमच्या देशाचा तिरंहा वापरू नका," असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला.
Whoever is waving this Indian flag should feel ashamed. Don’t use our tricolour to participate in such violent & criminal acts in another country. pic.twitter.com/CuBMkq9Siu
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) January 7, 2021
अमेरिकी संसदेत बुधवारी मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.
ट्रम्प यांचे आधी समर्थन नंतर आवाहन
संसद परिसरात जसजशी आपल्या समर्थकांची गर्दी होऊ लागली तसतसा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी अधिक संख्येनं लोकांनी यावं, असं आवाहन केले. मात्र, समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात करताच ट्रम्प यांनी ‘या निवडणुकीत निश्चितच घोटाळा झाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले होऊ नका. शांतता राखा आणि घरी जा,’ असं आवाहन समर्थकांना केलं.