धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:41 PM2024-09-24T16:41:17+5:302024-09-24T16:42:13+5:30
जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन एकट्या ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होते.
Amazon rainforest : पृथ्वीचे 'फुफ्फुस' अशी ओळख असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ॲमेझॉन रेन फॉरेस्टबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 4 दशकांमध्ये ॲमेझॉन जंगलाने जर्मनी आणि फ्रान्सच्या क्षेत्रफळाइतके क्षेत्र गमावले आहे. याचे प्रमुख कारण जंगलतोड असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ॲमेझॉन जंगल पृथ्वीवरील हवामान संतुलन राखण्यात आणि ग्लोबल वार्मिंगशी लढण्यात सर्वात मोठी मदत करतात.
जगातील 9 देशांमध्ये पसरलेल्या ॲमेझॉनच्या जंगलांना पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात. जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन एकट्या ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होते. अॅमेझॉनची जंगले पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात, जे हवामान बदलाचे एक प्रमुख कारण आहे.
खाणकाम आणि शेतीसाठी अंदाधुंद वृक्षतोड
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, खाणकाम आणि शेतीच्या उद्देशाने जंगलतोड केल्यामुळे अॅमेझॉनच्या जंगलाचे 12.5 टक्के क्षेत्र नष्ट झाले आहे. संशोधकांच्या मते, हे नुकसान 1985 ते 2023 दरम्यान झाले. खाणकाम, शेती आणि पशुधनासाठी अॅमेझॉन वनजमिनीच्या वापरामध्ये चिंताजनक वाढ झाल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे.
या 9 देशांमध्ये पसरले ॲमेझॉनचे 'रेन फॉरेस्ट'
अॅमेझॉनचे जंगल ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयानापर्यंत पसरलेले आहे. सुमारे 8 लाख 80 हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे जंगल पृथ्वीचे तापमान संतुलित राखण्यात आणि वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. संशोधकांच्या मते, अॅमेझॉनच्या जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणात परिसंस्था नाहीशी झाली आहे.
ॲमेझॉन जंगलांचा ऱ्हास मोठा धोका
इन्स्टिट्यूट ऑफ द कॉमन गुड, या अभ्यासात सहभागी झालेल्या पेरूतील संस्थेच्या सॅन्ड्रा रिओ कासारेस म्हणतात की, जंगले गमावल्याने वातावरणात अधिक कार्बन उत्सर्जन होते आणि यामुळे हवामान आणि पर्जन्य चक्रांचे नियमन करणारी संपूर्ण परिसंस्था विस्कळीत होते. ॲमेझॉनच्या जंगलातून लाखो वनस्पती नष्ट होण्याचा थेट संबंध दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती आणि जंगलातील आगीशी आहे.
ॲमेझॉन नदीच्या पातळीतही घट झाली
वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन नेटवर्क ऑफ सायन्सने रविवारी सांगितले की, वातावरणातील बदलामुळे ॲमेझॉन आणि पॅन्टॅनल पाणथळ भागात आग लागण्याचा धोका आणि तीव्रता वाढत आहे, ज्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत जग जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत ॲमेझॉन आणि पँटानल आर्द्र प्रदेशात आग लागण्याचा धोका वाढतच जाईल. गेल्या काही दशकांमध्ये ॲमेझॉनच्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर वसलेल्या भागात राहणाऱ्या सुमारे 4 कोटी 70 लाख लोकांच्या रोजीरोटीला धोका निर्माण झाला आहे.