धक्कादायक! अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर झाला हल्ला, हॉटेलबाहेरच्या राड्यात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 01:19 PM2024-02-10T13:19:57+5:302024-02-10T13:21:21+5:30
चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेत भारतीयाच्या हत्येची ही तब्बल पाचवी घटना आहे
Indian Man Died In US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यक्तीचे वय ४१ वर्षे असून हाणामारीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ही घटना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन डाउनटाउनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर घडली. चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेत भारतीयाच्या हत्येची ही तब्बल पाचवी घटना आहे. विवेक चंदर तनेजा असे मृताचे नाव असून तो व्हर्जिनियामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक तनेजा हा भारतीय वंशाचा व्यक्ती व्हर्जिनियामध्ये राहत होता. २ फेब्रुवारी रोजी ते '2 सिस्टर्स' नावाच्या जपानी रेस्टॉरंटमध्ये होते. “एका संशयिताने त्याला जमिनीवर फेकले आणि त्याचे डोके फुटपाथवर आपटले,” अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने पोलिसांच्या अहवालाच्या हवाल्याने दिली.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले होत असताना हे प्रकरण समोर आले आहे. ४१ वर्षीय विवेक तनेजा रात्री २ वाजता रेस्टॉरंटमधून बाहेर पडला होता. रेस्टॉरंटजवळील रस्त्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या अहवालानुसार, हा हल्ला का झाला? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हल्ल्यानंतर विवेक बेशुद्ध अवस्थेत होता. पोलिसांना माहिती मिळाली आणि ते तेथे पोहोचले तेव्हा विवेक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. यानंतर त्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, विवेक तनेजा यांचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या पोलीस cctvमध्ये कैद झालेल्या संशयिताचा शोध घेत आहेत. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
याआधीच्या घटना
श्रेयस रेड्डी बेनिगर, यूएस पासपोर्ट असलेला १९ वर्षांचा विद्यार्थी गेल्या आठवड्यात मृतावस्थेत आढळून आला होता. याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला पर्ड्यू विद्यापीठात नील आचार्य हा एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. यापूर्वी १६ जानेवारीला हरयाणाचा २५ वर्षीय विवेक सैनी जॉर्जियातील लिथोनिया येथे एका व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. सध्या अमेरिकन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.