धक्कादायक ! संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या 333 देवमाशांची कत्तल
By admin | Published: March 31, 2017 06:02 PM2017-03-31T18:02:42+5:302017-03-31T18:03:30+5:30
जपानच्या वैज्ञानिकांनी संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या तब्बल 333 देवमाशांची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.
ऑनलाइन लोकमत
जपान, दि. 31 - जपानच्या वैज्ञानिकांनी संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या तब्बल 333 देवमाशांची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. अंक्टार्टिक महासागरातून 333 मृत व्हेल माशांनी भरलेली तीन जहाजं जपानच्या बंदरावर परत आली आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
संशोधनाच्या नावाखाली या देवमाशांची कत्तल करण्यात आली आहे, असं कारण जपाननं पुढे केलं आहे. जगातील देवमाशांची शिकार करून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याचा एकमेव कारखाना फक्त जपानमध्ये आहे. या देवमाशांना मारण्यासाठी जपानकडून चार महिन्यांची मोहीमही राबवण्यात आली होती. तसेच देवमाशांच्या मांसाला जपानच्या बाजारात मोठी मागणी असल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शाळेतील मुलांच्या जेवणावळीत या देवमाशांच्या मांस दिलं जात असल्याचंही समोर आलं आहे.
जपानवर व्यावसायिक कारणांसाठी देवमाशांची कत्तल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून 1986ला बंदी घालण्यात आली होती. मात्र वैज्ञानिकांच्या संशोधनाच्या नावाखाली बंदी झुगारून या देवमाशांची कत्तल केली आहे. संयुक्त राष्ट्रात 2015मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं जपानवर देवमाशांची शिकार करण्यात पूर्णतः बंदी घातली होती. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत जपाननं पुन्हा देवमाशांची कत्तल केली आहे. मात्र मिंक जातीच्या देवमाशांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्यानं पर्यावरणवाद्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.