धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, अमेरिकेतील घटना, पुण्याशी होतं खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:12 AM2023-02-08T10:12:29+5:302023-02-08T10:22:07+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला. सॅन होजे शहरातील एका उद्यानामध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता. दरम्यान, हा अमेरिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता, असं सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुतळ्याची चोरी कधी झाली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. आता सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या मदतीने सदर पुतळ्याची विटंबना करून तो चोरणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पार्क रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेसने ट्विट करत सदर पुतळा चोरीस गेल्याची माहिती दिली.
दरम्यान, चोरीला गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चोरीला गेल्या पुतळ्याचं पुणे शहराशी खास नातं होतं. अमेरिका आणि भारतामध्ये राबवण्यात येत असलेल्या सिस्टर सिटी मोहिमेमधून सॅन होजे आणि पुण्यामध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सॅन होजे शहराला भेट देण्यात आला होता. हा पुतळा शहरातील एका उद्यानात ठेवण्यात आला होता.