लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला; ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी दिला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 11:42 AM2020-04-02T11:42:07+5:302020-04-02T11:43:51+5:30
तेर्ते यांनी पहिल्यांदाच देशातील लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला नसून याआधीही त्यांनी असे आदेश काढलेले आहेत. २०१६-१७ मध्ये राष्ट्रपतींनी ड्रग डिलर्सला कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ठार करण्याचे आदेश दिले होते.
नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काही देशांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच आता एका देशाच्या राष्ट्रपतींनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला आहे.
फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्ते यांनी आपले सरकार, प्रशासन आणि पोलिसांना आदेश दिले की, लॉकडाऊनचे पालन न करणारे आणि अडचण निर्माण करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घाला. हा इशारा संपूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे या क्षणाला देशातील नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे पालन करावे, असंही त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याशी किंवा डॉक्टरांशी गैरवर्तन करू नये. अन्यथा हा मोठा अपराध मानला जाईल, असंही दुतेर्ते यांनी स्पष्ट केले.
पोलीस आणि सुरक्षारक्षकांना मी आदेश देतो की, लॉकडाउनमध्ये अडचण निर्माण करणाऱ्याला लगेच गोळ्या घाला. दुतेर्ते यांनी पहिल्यांदाच देशातील लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला नसून याआधीही त्यांनी असे आदेश काढलेले आहेत. २०१६-१७ मध्ये राष्ट्रपतींनी ड्रग डिलर्सला कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ठार करण्याचे आदेश दिले होते.
फिलीपाईन्समध्ये आतापर्यंत २३११ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ मार्चच्या आसपास राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तेने यांनी देखील कोरोना व्हायरसची तपासणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तसेच स्वत:ला त्यांनी वेगळं करून घेतले होते. या व्यतिरिक्त फिलीपाईन्सची संसद आणि केंद्रीय बँकेला देखील क्वारान्टाईन करण्यात आले होते.