अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; पाच मृत, १६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 11:32 PM2022-07-04T23:32:07+5:302022-07-04T23:32:58+5:30
परेडच्या ठिकाणावरील एक उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या ५७ तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये माथेफिरुंकडून गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. शिकागोच्या हायलँड पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.
परेडच्या ठिकाणावरील एक उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या ५७ तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच, नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. पोलिस आणि वैद्यकीय पथकांना त्यांचे काम करू द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
डब्ल्यूजीएनच्या वृत्तानुसार फायरिंगमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. तो एका काळा रंगाच्या एसयुव्हीतून आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे प्रतिनीधी ब्रैड श्नाइडर हे या परेडच्या पुढील भागात होते. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले. परेड सुरु झाल्यानंतर १० मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला. यानंतर परेड थांबविण्यात आली. गोळीबारामुळे लोकांमध्ये धावपळ उडाली.