शूटआऊट! मेक्सिको बंदुकधारींनी सुरक्षादलांवर केला अंदाधुंद गोळीबार; १० गुंडांचा खात्मा, ३ पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:33 PM2022-06-15T19:33:15+5:302022-06-15T19:39:51+5:30
Shootout in Mexico : मॅक्सिको शहराच्या नैऋत्येला सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या टेक्सकाल्टिट्लान शहरात गोळीबार झाला.
मेक्सिकोमधील टेक्सकाल्टिट्लान येथे मंगळवारी पोलीस आणि बंदूकधाऱ्यांमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये 10 बंदुकधारी ठार तर 4 पोलीस जखमी झाले. या घटनेत सहभागी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मेक्सिको शहराच्या नैऋत्येला सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या टेक्सकाल्टिट्लान शहरात गोळीबार झाला.
पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे जप्त केली
पोलिसांनी घटनास्थळावरून 20 रायफल, पिस्तूल, हँडगन, काडतुसे, पाच वाहने, लष्करी गणवेश आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त केले आहेत. मेक्सिकोमध्ये ज्या भागात गोळीबार झाला तो भाग ड्रग डीलर आणि टोळीयुद्धांच्या दहशतीने ग्रासलेला आहे. या घटनेची माहिती मेक्सिकोच्या सरकारी वकील कार्यालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली.
हिंसाचारामुळे सरकार त्रस्त
राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मैनुअल लोपेज ओब्रेडोर यांचे सरकार या हिंसाचारामुळे हैराण झाले आहे. अलीकडेच मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी लोकांनी निदर्शने केली. मॅन्युएल लोपेझ सरकारने आश्वासन दिले होते की, हिंसा आणि गुन्हेगारीला आळा बसेल. आता मंगळवारी सुरक्षा दलांवर झालेल्या गोळीबारामुळे सरकारची चिंता वाढली आहे.