गोळीबार करणारा होता अफगाणिस्तानात सैनिक
By admin | Published: July 10, 2016 02:29 AM2016-07-10T02:29:03+5:302016-07-10T02:29:03+5:30
अमेरिकेतील डलास शहरात गोळीबार करून पाच पोलिसांची हत्या करणारा अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी सैनिक होता. तो राखीव तुकडीत होता, असे उघड झाले आहे.
ह्यूस्टन/वॉशिंगटन : अमेरिकेतील डलास शहरात गोळीबार करून पाच पोलिसांची हत्या करणारा अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी सैनिक होता. तो राखीव तुकडीत होता, असे उघड झाले आहे.
कायदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, २५ वर्षीय मिकाह झेवियर जॉन्सन असे आरोपीचे नाव असून, त्याने काल गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अर्ध-स्वयंचलित असॉल्ट रायफल आणि पिस्तुलाद्वारे पोलिसांवर हल्ला केला होता. त्याने १२ पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यातील पाच जण ठार झाले. अमेरिकेत दोन कृष्णवर्णियांना पोलिसांनी गोळ्या घातल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनादरम्यान त्याने गोळीबार केला होता. जॉन्सनला २0१५ पर्यंत सहा वर्षांसाठी अफगाणिस्तानात लष्करी रिझर्विस्ट म्हणून सेवा बजावली होती.
ओबामा दौरा अर्धवट सोडणार
डलास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आपल्या युरोप दौऱ्यात एका दिवसाची कपात करणार आहेत. एक दिवस आधीच म्हणजेच रविवारी ते अमेरिकेत परततील. त्यानंतर पुढील आठवड्यात ते डलासला भेट देतील. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी काल एका निवेदनात ही माहिती दिली. डलासचे महापौर माइक रॉलिंग्ज यांनी ओबामा यांना डलास भेटीचे निमंत्रण दिले आहे. ते ओबामा यांनी स्वीकारले आहे, असे अर्नेस्ट यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)