घरभाडं भरू, की मूल जन्माला घालू?; ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठाचं अनोखं संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 08:48 AM2022-01-12T08:48:17+5:302022-01-12T08:48:30+5:30

महागाईसंदर्भात असाच एक अभ्यास नुकताच झालाय, पण तो आहे, स्थावर मालमत्तेसंदर्भात.  

Should I pay the rent, or should I Born Baby ?; Unique research from the University of Sydney, Australia | घरभाडं भरू, की मूल जन्माला घालू?; ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठाचं अनोखं संशोधन

घरभाडं भरू, की मूल जन्माला घालू?; ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठाचं अनोखं संशोधन

Next

समजा, तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात आणि घरभाडं वाढतच राहिलं, तर मुलं जन्माला घालावीत, असं तुम्हाला वाटेल? तुम्ही ऑस्ट्रेलियात राहत असाल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे : नाही! भाड्याच्या घरात राहणारी जोडपी शक्यतो मुलांना जन्म देण्याला नाखूश असतात, असं एका ताज्या संशोधनातून समोर आलेलं निरीक्षण आहे. महागाई वाढली की लोक आणखी गरीब होतात. त्यांना अधिक काटकसर करावी लागते, जगण्यासाठी अधिक धडपड करावी लागते, अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागते, त्यांचं आयुष्य धोक्यात येतं, हे तर खरंच... यासंदर्भात आजपर्यंत अनेक अभ्यास झाले आहेत आणि महागाईच्या विविध पैलूंचा विशेषत: गरीब आणि सामान्य लोकांवर होणारा विपरित परिणाम शोधण्याचे प्रयत्नही सतत होत असतात.

महागाईसंदर्भात असाच एक अभ्यास नुकताच झालाय, पण तो आहे, स्थावर मालमत्तेसंदर्भात.  ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी एक अत्यंत अनोखं असं संशोधन केलंय, ज्याचा याआधी कोणी विचारही केला नव्हता. घरांच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या, तर त्याचा लोकसंख्येवर कसा परिणाम होतो किंवा मुलांना जन्माला घालण्याबाबत लोक कसा विचार करतात, याचा हा अभ्यास डोळ्यांत अंजन घालणारा आहे. सिडनी विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर स्टीफन व्हीलेन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी २००१ ते २०१८ पर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील घरांच्या  किमतीचा त्यांनी अभ्यास केला. ऑस्ट्रेलियात जागा आणि घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या दोन वर्षांत तर त्यात तब्बल वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घरांच्या किमती वाढल्या, तर त्याचा सरळ संबंध लोकांच्या मूल जन्माला घालण्याच्या शक्यतेवर होतो, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.
प्रो. व्हीलेन सांगतात, घरांच्या किमती वाढल्या, तर त्यासाठी काय योजना आखल्या पाहिजेत, यावर तातडीनं राष्ट्रीय चर्चा होतात, घडवल्या जातात. पण घरांच्या किंमतवाढीचा लोकांच्या ‘कुटुंब-नियोजनावर’वर काय परिणाम होतो, याचा साधा विचारही कोणी करत नाही.
घरांच्या किमती वाढल्या की, पर्यायाने घरांचे भाडेही वाढते. त्यामुळे लोक लगेचच मुलांना जन्माला घालण्याबाबत साशंक होतात आणि मूल जन्माला घालायचं एक तर पुढे ढकलतात, नाही तर थेट रद्दच करतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. त्याचवेळी ज्यांचं स्व-मालकीचं घर आहे आणि त्याच्या किमतीत वाढच होते आहे हे जाणवलं, तर लोक आपली ‘फॅमिली’ वाढविण्याचाही निर्णय घेतात, हेही दिसून आलं आहे.

यासंदर्भात प्रो. व्हीलेन यांचा निष्कर्ष आहे, एखाद्या घरमालकाच्या घराची किंमत समजा एक मिलिअन ऑस्ट्रेलियन डॉलर्सने (सुमारे ५४ लाख रुपये) वाढली, तर त्या कुटुंबातील मुलांची संख्या वाढण्याची शक्यताही १८ टक्क्यांनी वाढते. पण घरांचं भाडं वाढलं, तर मात्र लगेच कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलांची संख्याही कमी होते. ज्यांचं स्वत:चं घर आहे आणि जे भाड्याच्या घरात राहतात, त्यांची तुलना केली, तर स्वत:चं घर असलेल्या कुटुंबातील मुलांची संख्या सरासरी जास्तच आढळून आली आहे. 

सर्वसाधारण महागाई वाढीचा मुलांच्या जन्मावर फारसा परिणाम होत नाही, पण घरांच्या किमती आणि त्यातही घरभाडं वाढलं, तर मुलं जन्माला घालायची लोकांची इच्छाच कमी होते. आर्थिकदृष्ट्या जे खालच्या, निम्न स्तरावर आहेत, अशी कुटुंबे तर लगेच याकडे गांभीर्यानं पाहायला लागतात. मुलं जन्माला घालण्याच्या आधी आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, छोटं का होईना, आपलं स्वत:चं घर कसं, कधी होईल, याचा विचार ते प्रामुख्यानं करायला लागतात. याबाबतीत संपूर्ण जगभरातील लोकांची मानसिकता सर्वसाधारणपणे सारखीच आहे.

ऑस्ट्रेलियात महागाई जसजशी वाढते आहे, तसतशी गरीब, मध्यमवर्गीय घरातील मुलांची संख्या घटते आहे, हे दिसून आलं आहे. दीर्घ कालावधीपासून म्हणजे १९७० पासून लोकांमध्ये ही प्रवृत्ती वाढत असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे तुलनेनं गरीब घरातील कुटुंबाचा आकार आणखी मर्यादित होत आहे. ‘इकॉनॉमिक्स ऑफ फॅमिलीज’ या संशोधनामुळे जगप्रसिद्ध असलेले नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ गॅरी बेकर तर अर्थशास्त्रीय परिभाषेत ही संकल्पना मांडताना म्हणतात, ‘एखाद्याचं उत्पन्न वाढलं, तर त्याच्याकडून ‘सामान्य वस्तूं’चा उपभोगही वाढतो. हाच न्याय कुटुंबाला लावला, तर उत्पन्न वाढल्यास, त्या कुटुंबातील प्रजनन दर वाढण्याचीही शक्यता असते.’

Web Title: Should I pay the rent, or should I Born Baby ?; Unique research from the University of Sydney, Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.