जगभरात मानवी शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट, आयुर्मान कमी होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:52 AM2022-11-17T07:52:55+5:302022-11-17T07:53:18+5:30
Health News : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे.
लंडन : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण कमी झाल्याने अंडकोष कॅन्सर आणि आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ५३ देशांमधील डेटा वापरण्यात आला आहे. त्यामध्ये अतिरिक्त सात वर्षांचा डेटा (२०११-२०१८) समाविष्ट आहे. याआधी पुनरावलोकन न केलेल्या विशेषत: दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या प्रदेशामधील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा डेटा दर्शवितो की, प्रथमच त्या प्रदेशामधील पुरुषांमध्ये एकूण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या केंद्रीकरणात लक्षणीय घट पूर्वी उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात दिसून आली आहे. शुक्राणुंची संख्या आणि केंद्रीकरण यानंतर २००० नंतरची झपाट्याने घट दर्शविण्यात आली आहे. अमेरिकेतील इकान स्कूल ऑफ मेडिसिन, माउंट सिनाई येथील प्रोफेसर शन्ना स्वान यांनी सांगितले की, कमी शुक्राणूंची संख्या केवळ पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम करत नाही, तर पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
उपाय शोधणे गरजेचे
n पुनरुत्पादन आरोग्यास धोका निर्माण करणारे घटक कमी करण्यासाठी तातडीने जागतिक स्तरावर कार्यवाही झाली पाहिजे.
n भारतातही वेगळा अभ्यास झाला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले. तथापि, भारतातील कल वेगळा आहे असे समजण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
४६ वर्षांत वेगाने घट
भारतातही ही घट दिसून येत असल्याचे इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक हागेई लेव्हिन यांनी सांगितले. आम्ही गेल्या ४६ वर्षात जागतिक स्तरावर शुक्राणूंच्या संख्येत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट पाहत आहोत. ही घसरण अलीकडच्या वर्षात वेगवान झाली आहे, असे ते सांगतात.
सध्याच्या अभ्यासात शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या कारणांचे परीक्षण केले जात नाही. लेव्हिन यांनी अलीकडील केलेले त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. ते दर्शविते की, गर्भधारणा काळात आढळून येणाऱ्या अनेक अडचणींचा संबंध प्रजनन क्षमतेच्या दुर्बलतेशी जोडलेला असतो. याशिवाय, जीवनशैली आणि वातावरणातील रसायने हे गर्भाच्या विकासावर विपरित परिणाम करतात.